CoronaVirus News: कोरोनाच्या काळात शाळा बंद ठेवणे अयोग्यच: जागतिक बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:43 AM2022-01-17T06:43:52+5:302022-01-17T06:45:23+5:30

शाळांमुळे संसर्ग वाढल्याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत

No justification now for keeping schools closed in view of COVID 19 says World Bank Education Director | CoronaVirus News: कोरोनाच्या काळात शाळा बंद ठेवणे अयोग्यच: जागतिक बँक

CoronaVirus News: कोरोनाच्या काळात शाळा बंद ठेवणे अयोग्यच: जागतिक बँक

Next

नवी दिल्ली : शाळा सुरू ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतो, असे कोणतेही शास्त्रीय पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे साथीच्या काळात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अयोग्यच आहे,  असे जागतिक बँकेच्या शिक्षण विभागाचे संचालक जैमी सावेंद्र यांनी म्हटले आहे. साथीमध्ये शाळा बंद ठेवणे हा अगदी शेवटचा पर्याय आहे. कोरोनाचा जगातील शिक्षणव्यवस्थेला फटका बसला असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाचा शिक्षणावर कोणता परिणाम झाला, याचा सावेंद्र व त्यांचे सहकारी सध्या अभ्यास करत आहेत. त्यांनी सांगितले की, साथीच्या काळात शाळा हे सुरक्षित ठिकाण नसल्याचे सिद्ध झालेले नाही. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काही लाटा येऊन गेल्या. त्यावेळी काही देशांनी शाळा पुन्हा सुरू केल्या. त्यामुळे संसर्गा आणखी वाढला, असे काही दिसून आले नाही.

जैमी सावेंद्र म्हणाले की, मुलांना ही बाधा झाली तरी त्यांची प्रकृती गंभीर होणे तसेच मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. ओमायक्रॉन संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असला तरी मुलांना त्याचा फारसा धोका नाही, हे नीट लक्षात घेतले पाहिजे. मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करू, अशी अशास्त्रीय  भूमिका कोणत्याही देशाने घेतलेली नाही. कोरोना काळात भारतामध्ये शाळा बंद ठेवल्याने अनेकांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले. 

त्यांनी सांगितले की, १० वर्षे वयाच्या अनेक मुलांना साधी अक्षर ओळखही नसते. कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने भारतात अशा मुलांची संख्या वाढेल. या साथीमुळे भारतात शिक्षणक्षेत्र तसेच विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. (वृत्तसंस्था) 

राज्यातील शाळांबाबत १५ दिवसांत आढावा घेऊन निर्णय : राजेश टोपे
जालना : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या. मात्र, त्या पुन्हा सुरू करण्याबाबत शिक्षक संघटना आणि विशेषकरून इंग्रजी शाळाचालक आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी १५ दिवसांमध्ये संपूर्ण रुग्णवाढीचा वेग आणि उपाययोजनांचा आढावा घेऊन नंतर शाळा सुरू करण्यासाठी विचार होऊ शकतो. परंतु हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. कमी रुग्ण असलेल्या गावांमध्ये ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत त्या सुरू करता येतील, अशी शक्यता टोपे यांनी व्यक्त केली.       

पुढील १० दिवस धाेक्याचे, ४ लाखांपर्यंत रुग्णांची शक्यता 
पुढील १० दिवस देशात काेराेनाचे राेज ४ लाखांवर रुग्ण येतील, असा अंदाज आहे. यानंतर ही लाट ओसरायला सुरुवात हाेईल. काही दिवसांपूर्वी देशात राेज 
७ ते ८ लाख काेराेना रुग्ण आढळतील असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. 
परंतु यात आता सुधारणा झाल्याची माहिती आयआयटी कानपूरचे प्राे. मनिंदर अग्रवाल यांनी ‘लाेकमत’ला दिली. प्राे. अग्रवाल सांख्यिकीय तज्ज्ञ असून त्यांनी दिलेले अंदाज खरे ठरले आहेत. 
अग्रवाल काेराेना पॅटर्ननुसार अनेक सरकारने आराेग्य सुविधांमध्ये बदल केले. तिसऱ्या लाटेसंदर्भात अग्रवाल म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात आता सुधारणा करावी लागेल. 

कोरोना विषाणूचा संक्रमण दर बराच कमी 
झाला आहे. त्यामुळे आधी ८ लाखापर्यंत रुग्ण आढळतील, असा अंदाज हाेता. ती संख्या राेज चार लाख एवढीच राहील. लाट पुढील ८ ते १० दिवस राहण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. 

डेल्टा व ओमायक्रॉनच्या वेगवेगळ्या साथी!
ओमायक्रॉन हा कोरोना महामारीतून उत्पन्न झाला असला तरी तो डेल्टा विषाणूपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे सध्या डेल्टा व त्याचे उप प्रकार यांची एक व ओमायक्रॉनची एक अशा दोन वेगवेगळ्या साथी सुरु आहेत, असे विषाणूतज्ज्ञ टी. जेकब जॉन म्हणाले. ओमायक्राॅन हा विषाणू वुहान -डी ६१४ जी, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, कप्पा किंवा मू या कोरोना विषाणूंचा उप प्रकार नाही. तो कोरोनाचा स्वतंत्र प्रकार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जगातील कोरोना रुग्णांची संख्या ३२.७० कोटींवर
वॉशिंग्टन : जगात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ३२.६६ लाख नवे रुग्ण आढळले तर १० लाख लोक बरे झाले. जागतिक स्तरावर रुग्णांची एकूण आकडेवारी ३२.७० कोटी असून आजवर ५५ लाख ५५ हजार लोकांचा मृत्यू झाला.    

Web Title: No justification now for keeping schools closed in view of COVID 19 says World Bank Education Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.