समुद्रकिनाऱ्यांवरील पुरुषांची नग्नता रोखा; महिला आयोगाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 05:41 PM2018-11-21T17:41:30+5:302018-11-21T17:43:38+5:30
गेल्या महिन्यात मी गोकर्ण येथे गेले होते, त्यावेळी काही पुरुष तेथील बीचवर नग्नवस्थेत फिरताना आम्हाला दिसले.
बंगळुरू - कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पत्र लिहून समुद्र किनाऱ्यावरील पुरुषांच्या नग्न फिरण्याला आक्षेप घेत ठोस भूमिका घेण्याची विनंती केली आहे. तसेच बीचवर फिरण्यासाठी पुरुषांना ड्रेसकोड ठरवून द्यावा, असेही एनजी नागालक्ष्मीबाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. गोकर्णा बीचवर काही पुरुषांना नग्न अवस्थेत फिरतानाच्या पाहण्यात आले होते. त्यामुळे नागालक्ष्मीबाई यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.
गेल्या महिन्यात मी गोकर्ण येथे गेले होते, त्यावेळी काही पुरुष तेथील बीचवर नग्नवस्थेत फिरताना आम्हाला दिसले. त्या पुरुषांनी थोडे तरी कपडे आपल्या अंगावर चढवायला हवे होते, असे नागालक्ष्मीबाई यांनी मुख्यमत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. बीचसारख्या पर्यटन ठिकाणावर पुरुषांचे असे बिनधास्त वागणे हे केवळ महिला आणि लहान मुलांसाठी धोकादायक नसून तेथील सुरक्षेचाही महत्वाचा प्रश्न आहे. तसेच, तेथील बीचवर अनेक लहान मुलांसह, महिला आणि तरुण मुलीही फिरतात. विशेष म्हणजे या बीचवर काही तरुण मुली उदरनिर्वाहासाठी वेगवेगळी दुकाने चालवतात. त्यावेळी या मुलींना पुरुषांच्या बिनधास्त वागण्याचा त्रास होतो. तसेच कित्येकदा या मुलींचा विनयभंगही करण्यात आल्याच्या तक्रारी मुलींनी केल्या आहेत. त्यामुळे या बीचवर अधिकची पोलीस सुरक्षा वाढविण्याची मागणीही नागालक्ष्मीबाई यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.
कर्नाटकमध्ये 22 बीचेस आहेत. त्यामुळे राज्यातील वाढत्या पर्यटनाची, देशाच्या संस्कृतीची दखल घेऊन पुरुषांना बीचवर नग्न फिरणे बंद करावे, शिवाय याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा, कर्नाटकची ओळख नग्न बीचसाठी प्रसिद्ध ठिकाण अशी व्हायला वेळ लागणार नाही, असेही नागालक्ष्मीबाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.