भ्रष्टाचारी कितीही माेठा असाे, कारवाई हाेणारच! मेरठच्या सभेतून मोदींचा विरोधी आघाडीवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:28 AM2024-04-01T10:28:24+5:302024-04-01T10:34:48+5:30
Narendra Modi News: “भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी लढाई लढतोय, आपल्यावरील हल्ल्यांमुळे भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई थांबणार नाही, भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कारवाई केली जाईल,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधी ‘इंडिया’ आघाडीवर केली.
मेरठ (उत्तर प्रदेश) : “भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी लढाई लढतोय, आपल्यावरील हल्ल्यांमुळे भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई थांबणार नाही, भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कारवाई केली जाईल,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधी ‘इंडिया’ आघाडीवर केली. “जेव्हा आपण भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई पूर्ण ताकदीने लढत आहोत, तेव्हा या लोकांनी ‘इंडिया’ आघाडी केली आहे. त्यांना वाटते की ते मोदी त्यांना घाबरतील, परंतु माझ्यासाठी, माझा भारत माझा परिवार आहे आणि मी भ्रष्टाचारापासून संरक्षण करण्यासाठी पावले उचलत आहे,” असे ते उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सभेत म्हणाले.
“भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करत असल्याने काही लोक नाराज झाले आहेत. मी माझ्या देशाला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवण्यासाठी एक मोठी लढाई लढत आहे. मोठमोठे भ्रष्टाचारी आज तुरुंगात आहेत आणि सर्वोच्च न्यायालयातूनही त्यांना जामीन मिळत नाही,” हे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले.
“ही निवडणूक दोन गटांतील लढाई आहे. एकीकडे एनडीए भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे भ्रष्ट नेत्यांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारी ‘इंडिया’ आघाडी आहे. भ्रष्टाचार हटवायचा की नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे. ज्यांनी लूट केली आहे, ती देशाला परत द्यावी लागेल, ही मोदींची ‘गॅरंटी’ आहे”, असे ते म्हणाले.
या जाहीर सभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह दूरचित्रवाणी मालिका ‘रामायण’ फेम ज्येष्ठ अभिनेते आणि मेरठ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अरुण गोविल उपस्थित होते.
१० वर्षात विकासाचा फक्त ट्रेलर पाहिला....
२०२४ ची निवडणूक केवळ सरकार बनवण्यासाठी नाही तर ‘विकसित भारत’ बनवण्यासाठी आहे, आमच्या सरकारने तिसऱ्या कारकिर्दीची तयारी सुरू केली आहे. पहिल्या १०० दिवसात कोणते मोठे निर्णय घ्यायचे आहेत यावर काम सुरू आहे. १० वर्षात तुम्ही विकासाचा फक्त ट्रेलर पाहिला आहे, आता देशाला खूप पुढे न्यायचे आहे, असे माेदी म्हणाले.