'ना मोदी, ना राहुल गांधी... दोघांपैकी कुणीही तुमचा मतदारसंघ सांभाळणार नाहीए!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:59 PM2019-04-16T16:59:16+5:302019-04-16T17:00:31+5:30
काँग्रेसकडून मी सेक्युलर मतदारांची विभागणी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - अभिनेता प्रकाश राज यांनी एका मुलाखतीत मतदारांना आवाहन करताना, ना मिस्टर मोदी ना राहुल गांधी, तुमच्या मतदारसंघाचा विकास करतात. त्यामुळे उमेदवार निवडताना आपल्याला आपला खासदार निवडायचा आहे, हे लक्षात ठेवावे, असे म्हटले आहे. तसेच, तुमचा उमेदवार कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतो ते महत्वाचं नाही. कारण, तो तुमच्या मतदारसंघापुरताच असून 500 पेक्षा जास्त खासदार मिळून त्यांचा नेता, देशाचा पंतप्रधान निवडतात, असेही प्रकाश राज यांनी म्हटले.
काँग्रेसकडून मी सेक्युलर मतदारांची विभागणी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, मी हिंदू विरोधी असल्याचा प्रचार उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडून माझ्याविरोधात होत आहे. पण, मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की, शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारीसंदर्भातील प्रश्नांवर मी भाष्य करत आहे. कारण, नागरिकांना बेरोजगारी, पाणी यांसारख्या मूळ समस्यांचा सामना करावा लागत आहे. मी गेल्या सहा महिन्यांपासून बंगळुरू मध्य मतदारासंघातील लोकांशी चर्चा करत आहे, त्यांना भेटत आहे. मी भलेही मोठ्या-मोठ्या प्रचारसभा घेत नाही. मोठ-मोठ्या रॅली काढत नाही. मात्र, मी कॉर्नर सभांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून त्यांच्या संपर्कात असल्याचंही प्रकाश राज यांनी म्हटलं आहे.
अपक्ष उमेदवाराचं महत्व मला चांगलंच माहित आहे. त्यामुळे लोकांनीही अपक्ष उमेदवाराचे महत्व ओळखायला हवे. सध्या देशात असलेल्या दोन मोठ्या राजकीय पक्षाला जनता कंटाळली आहे. नागरिकांचा कल हा या दोन्ही पक्षांच्या विरोधातच आहे. लोकांना बदल हवाय. त्यामुळे किती लोकांना बदल हवाय हे मला पाहायचंय. आपल्या सर्वांना तेच पाहायचंय. मी जरी प्रचार आता सुरु केला असेल, तरी गेल्या 15 पेक्षा जास्त वर्षांपासून मी येथील लोकांमध्ये असल्याचेही प्रकाश राज यांनी म्हटले.
आपण एका कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला हवं. देशासाठी, देशाच्या विकासासाठी म्हणून मी निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. मी गरीब कुटुंबातून आलोय, त्यामुळे गमवायला माझ्याकडे काहीच नाही. मी जे करेल ते मिळविण्यासाठीच. त्यामुळेच मी लोकांच्या जीवनातील गरीबीचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रकाश राज हे बंगळुरू सेंट्रल येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.