'डॉलरच्या तुलनेत रुपया 80 वर पोहोचला तरी चिंता नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:50 PM2018-08-15T15:50:14+5:302018-08-15T15:53:15+5:30
रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण
नवी दिल्ली: रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपयानं सत्तरी ओलांडली आहे. मात्र असं असलं तरी लोकांनी चिंता करु नये, असं आवाहन मोदी सरकारकडून करण्यात आलं आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत 80 वर पोहोचला तरी, चिंता करण्याचं कारण नाही, असं आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी म्हटलं आहे. रुपयाचं मूल्य घसरण्यासाठी देशाबाहेरील घडामोडी जबाबदार असल्याचंही ते म्हणाले.
काल रुपयानं ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली. डॉलरच्या तुलनेत रुपया 70 वर पोहोचला. तुर्कस्थानचं चलन असलेलं लिरा घसरल्याचा परिणाम जगभरात पाहायला मिळाला. भारतही याला अपवाद नाही. आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी आंतरराष्ट्रीय अर्थविश्वात घडणाऱ्या याच घडामोडींचा संदर्भ दिला. 'देशाबाहेर घडणाऱ्या घडामोडींमुळे रुपया घसरला आहे. त्यामुळे आपण चिंता करण्याचं कारण नाही. लवकरच परिस्थिती सुधारेल,' असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला.
यंदाच्या वर्षात रुपयाचं मूल्य 9 टक्क्यांनी घसरलं आहे. आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या चलनात इतकी मोठी घसरण झालेली नाही. विशेष म्हणजे एकट्या ऑगस्ट महिन्यात रुपयाचं मूल्य 5 टक्क्यांनी घसरलं आहे. मात्र रुपयाची स्थिती लिरा आणि रुबलपेक्षा चांगली आहे. तुर्कस्थानचं चलन असलेल्या लिराच्या मूल्यात ऑगस्ट महिन्यात 28 टक्क्यांची घट झाली आहे. तर रशियाचं चलन असलेलं रुबल याच महिन्यात 15 टक्क्यांनी घसरलं आहे. रुपयाच्या मूल्यातील घसरण टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रुपयाचं मूल्य घसरलं असल्यानं आरबीआयच्या प्रयत्नांना मर्यादित यश मिळताना दिसतं आहे.