पेट्रोल पंपांवर रोख पैसे द्यायची गरज नाही, फक्त अंगठा दाखवा अन् व्हा भुर्रर्रर्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 03:24 PM2018-08-03T15:24:53+5:302018-08-03T15:36:20+5:30
लवकरच देशातील सर्व पेट्रोल पंपावर बायोमेट्रीक पेमेंट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर रोख रक्कम, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे द्यायची गरज भासणार नाही.
नवी दिल्ली - लवकरच देशातील सर्व पेट्रोल पंपावर बायोमेट्रीक पेमेंट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर रोख रक्कम, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे द्यायची गरज भासणार नाही. ग्राहकांनी केवळ आपल्या अंगठ्याचा ठसा उमटवताच खरेदी केलेल्या पेट्रोलचे पैसे जमा होतील. पुढील दोन महिन्यात ही सेवा सुरू होणार आहे. मायक्रो एटीएम ऑक्सीजन मशिनच्या सहाय्याने ही पेमेंटसुविधा सुरू केली जाणार आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याबाबत ऑक्सीजन मायक्रो एजन्सी आणि आयडीएफसी बँकेशी करार केला आहे. मध्य प्रदेशमधील दोन पेट्रोल पंपावर ही मशिन लावण्यातही आली आहे. भोपाळ शहराला कॅशलेस इंडियामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन इंडियाने बुधवारी सर्वच पेट्रोलपंप मालकांसहित इतरही एजन्सींच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये आयओसीएलचे महाव्यवस्थापक आजम मतीन यांचाही समावेश होता. मतीन यांनीच या पेमेंट सुविधाबाबत माहिती दिली. भोपाळमधील पेट्रोलपंपांवर पुढील दोन महिन्यांत ही सेवा सुरु करण्यात येणार असून त्यासाठी सर्वच पेट्रोल पंपांकडून तयारी करुन घेतल्याचे मती यांनी सांगितले.
काय आहे मायक्रो एटीएम ऑक्सीजन मशिन
मायक्रो एटीएम ऑक्सीजन मशिन एकप्रकारची पॉईंट ऑफ सेल मशिन आहे. ज्याद्वारे रिटेल नेटवर्कच्या सहाय्याने पैसे ट्रान्सफर करता येतात. ही मशिन डेबिट, क्रेडिट, क्यूआर कोड, भीम, आधार पे आणि युनीफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) ची सेवा एकसोबत उपलब्ध करुन देते. त्यासाठी मशिनमध्ये केवीयीप्रकिया पूर्ण करावी लागणार आहे.
सेल्फ सर्व्हीसची सुरुवात होणार
पेट्रोलियम कंपनीकडून 7 ते 8 महिन्यात भोपाळमध्ये अशी मशिन लावणार आहे. ज्यामुळे सेल्फ सर्व्हीस शक्य आहे. या मशिनद्वारे ग्राहक आपल्या गरजेनुसार स्वत:च्या हाताने पेट्रोल आणि डिझेल भरु शकतील. तसेच याचे पेमेंटही ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी विदेशातून मशिन मागविल्या आहेत.