दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 12:55 PM2024-05-01T12:55:43+5:302024-05-01T13:25:23+5:30
दिल्ली आणि नोएडातील ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आल्याने खळबळ उडाली होती.
Delhi School Bomb Threats :दिल्लीकरांची आजची सकाळ बॉम्बस्फोटाच्या धमकीने झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दिल्ली- एनसीआरमधील सुमारे ६० शाळांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. यामध्ये अनेक हायप्रोफाईल शाळांचा देखील समावेश होता. ईमेलद्वारे धमकी मिळाल्याने विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवण्यात आलं.पोलिसांसह बॉम्बनाशक पथकाने शाळांचा ताबा घेत शोधाशोध सुरु केली होती. अशातच केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
दिल्ली एनसीआर येथील ६० शाळांमध्ये एकाच ईमेद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीवर गृह मंत्रालयाने महत्त्वाची सूचना दिली आहे. घाबरण्याची गरज नाही कारण दिल्ली-नोएडामध्ये बॉम्ब असल्याची बातमी खोटी आहे, असं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. पोलिसांनी पालकांना या परिस्थितीत अजिबात घाबरू नका असे सांगितले. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी धमकीचा ईमेल खोटा असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली आणि नोएडामधील शाळांमध्ये बॉम्ब असल्याच्या बातम्यांवर केंद्रीय गृहमंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे. "दिल्लीतील काही शाळांना बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाले आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रोटोकॉलनुसार अशा सर्व शाळांची कसून चौकशी केली आहे. काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. ही अफवा असल्याचे दिसून येत आहे. आम्ही जनतेला घाबरू नये आणि शांतता राखण्याची विनंती करतो, असं गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
आज सुबह मिली स्कूलों में बम की सूचना पर दिल्ली पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए प्राथमिक जांच में कुछ भी संदिग्ध नहीं पाया है
— Delhi Police (@DelhiPolice) May 1, 2024
दिल्ली पुलिस मौके पर पहुंच कर जांच कर रही है और परिस्थिति पूरी तरह नियंत्रण में हैं
आप सभी से अनुरोध है कि कानून पर भरोसा रखें और शांति बनाए रखें
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच वेळी सगळ्या शाळांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा ईमेल पाठवण्यात आला होता. यात केवळ असामाजिक घटक नसून काही संशयित संघटनाही यात सामील असू शकतात. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या अँटी टेरर युनिट स्पेशल सेलने ईमेल सर्व्हरच्या लोकेशनची कसून चौकशी सुरू केली आहे. अनेक मेल्सचे सर्व्हर लोकेशन बाहेरून येत आहेत.सर्व बाजूंनी या प्रकरणाच तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी पोलिस आयुक्तांशी बोलून दिल्ली-एनसीआरमधील शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्यांच्या मुद्द्यावर तपशीलवार अहवाल मागवला आहे. दिल्ली पोलिसांना शाळेच्या आवारात संपूर्ण तपास करा, गुन्हेगारांची ओळख पटवा आणि कोणतीही निष्काळजीपणा दाखवू नका अशा सूचना नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्या आहेत.