Corona Vaccination : ओमायक्रॉन संकट काळात NTAGI पॅनेलच्या सदस्याचे मोठे विधान; म्हणाले, 'मुलांना कोरोना लसीकरणाची गरज नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 04:23 PM2021-12-21T16:23:36+5:302021-12-21T16:24:18+5:30
Corona Vaccination : सध्या केंद्र सरकारकडून लसीकरणाबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
नवी दिल्ली : सध्या देशात लहान मुलांना कोरोना लसीकरण ( Corona Vaccination) करण्याची गरज नाही, असे कोरोना लसीकरणावर सरकारने स्थापन केलेल्या पॅनेलच्या सदस्याचे म्हणणे आहे. लहान मुलांना लस न देण्याचा निर्णय ज्या आकडेवारीच्या आधारे घेण्यात आला आहे, त्यावरून असे दिसून येते की कोरोनामुळे मुलांमध्ये मृत्यूदर नाही आहे.
दरम्यान, लहान मुलांसाठी लस मंजूर करण्यासाठी किंवा लसीकरण मोहीम सुरू करण्यासंदर्भात कोणतीही घाई केली जाऊ नये, असे ऑक्टोबरमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले होते. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे सदस्य डॉ. जयप्रकाश मुलयिल यांच्या म्हणण्यानुसार, पॅनेलने केंद्र सरकारला सांगितले आहे की, 'मुले ठिक आहेत आणि आपण सध्या मुलांना लसीकरण केले नाही पाहिजे'.
भारतात कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली होती. यानंतर 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर डॉ. जयप्रकाश मुलयिल म्हणाले, "कोरोनामुळे भारतात 12 वर्षांखालील मुलांचा मृत्यू झाल्याचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. कॅन्सर, ल्युकेमिया आणि इतर आजारांमुळे मुलांमध्ये मृत्यू झाल्याची नोंद आम्ही केली आहे, जिथे ते पॉझिटिव्ह आढळले होते, परंतु या मृत्यूचे कारण कोरोना असू शकत नाही."
सध्या केंद्र सरकारकडून लसीकरणाबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यापूर्वी भारत सरकार खूप सतर्क आहे. अशा परिस्थितीत, अंतिम आराखडा सादर करण्यापूर्वीच NTAGI ला सर्व पैलूंवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. यापूर्वीही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अधिका-यांना विकसित देशांमध्ये लहान मुलांचे लसीकरण कमी होण्यामागील कारणांची माहिती गोळा करण्यास सांगितले होते.