देशात १६ मेनंतर एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही; वैद्यकीय व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:45 AM2020-04-27T09:45:20+5:302020-04-27T09:56:32+5:30
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे.
नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आतापर्यत 29 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 6 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या घरात गेला आहे.
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग देखील मंदावला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तसेच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते आता दहा दिवसांवर गेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भारतातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी केला आहे. त्यामुळे या दाव्यानंतर भारतीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा
राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्थेच्या संशोधकांसह जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) काही प्रतिनिधींनी मांडलेल्या अभ्यासाद्वारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे, अशी माहिती व्ही. के. पॉल यांनी दिली. 'गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यासारख्या करोनाचे 'हॉटस्पॉट' ठरलेल्या राज्यांमधील रुग्णसंख्या जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय सरासरी कमी होणार नाही. तीन मेपासून रुग्णसंख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कदाचित दीड हजार रुग्ण रोज वाढतील. १२ मे रोजी ही संख्या एक हजारपर्यंत खाली येईल आणि १६ मेनंतर एकही नवा रुग्ण आढळणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे.
देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली २७,८९२ वर. तर आतापर्यंत एकूण ६१८५ रुग्ण बरे झाले असून ८७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १३९६ रुग्ण आढळले असून ४८ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.