मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही; शेतकरी आक्रमक
By मोरेश्वर येरम | Updated: December 31, 2020 21:41 IST2020-12-31T21:36:03+5:302020-12-31T21:41:50+5:30
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे महिन्याभराहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे.

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही; शेतकरी आक्रमक
नवी दिल्ली
केंद्र सरकार जोवर कृषी कायदे रद्द करुन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही, असा पवित्रा दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे महिन्याभराहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व चर्चा देखील निष्फळ ठरल्या आहेत. दिल्लीच्या सिंघू सीमेवर २५ नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलनाचं व्यवस्थापन पाहणाऱ्या हरजिंदर सिंग यांनी सरकारचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला. "जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमच्यासाठी नवं वर्ष नसेल", असं हरजिंदर म्हणाले.
केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये बुधवारी झालेल्या शेवटच्या चर्चेत सरकारने वाढते वीजदर आणि पेंढा जाळल्याबद्दल दंड आकारण्यात आल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले. पण सरकारनं असं चिंता व्यक्त करणं म्हणजे सेलिब्रेट करण्यासारखी घटना नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
"होय, आमचे कुटुंबिय आमची वाट पाहातायत. त्यांची आठवण आम्हाला येते. पण इथं हे आंदोलन करत असलेले शेतकरी बांधव देखील आमचं कुटुंबच आहे", असं हरजिंदर म्हणाले.