नोक-या मागणारे नव्हे, तर देणारे बना - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:17 AM2018-01-15T03:17:30+5:302018-01-15T03:17:48+5:30
नोकरी मिळत नाही, म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये. प्रसंगी नोकरीतल्या संधी सोडेन, पण मी स्वत: नोकºया देणारा बनेन, स्वत:चा व्यवसाय उभारेन, अशी भावना असायला हवी.
मुंबई : नोकरी मिळत नाही, म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये. प्रसंगी नोकरीतल्या संधी सोडेन, पण मी स्वत: नोकºया देणारा बनेन, स्वत:चा व्यवसाय उभारेन, अशी भावना असायला हवी. खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल, असे वातावरण तयार करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे यायला हवे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.
ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित आर्थिक जनतंत्र परिषद (इकॉनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह)च्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्यासह ठाणे, पालघर आणि मुंबईतील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले २०० यशस्वी उद्योजक उपस्थित होते. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकºया देणारे बना. वंचित, शोषित वर्गातील काही युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’सारखी संस्था अशा तरुणांना मदतीचा हात देत आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील आर्थिक व सामाजिक समानता लोकशाहीला अधिक बळकट करेल, असा विश्वास व्यक्त केला. युवाशक्ती ही देशाची ताकद आहे. कल्पकता व नवनिर्माणाची दृष्टी असणाºया या युवाशक्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्टार्टअप, मुद्रा, कौशल्य विकास यासारख्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. भारत युवा उद्योजकांचा देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय
सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले,
तर अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी आभार मानले.
मी एक प्रशिक्षणार्थी
विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यासाठी यापूर्वी मी १० ते १२ वेळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आलो आहे. तुमच्यासारखाच एक प्रशिक्षणार्थी म्हणून दिवंगत प्रमोद महाजन आणि अन्य नेत्यांकडून प्रशिक्षण घेतले आहे.आज राष्ट्रपती म्हणून या संस्थेच्या आवारात आल्यानंतर अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी या संस्थेस कुठे-कुठे भेट दिली, कसा राहिलो, कसा शिकत गेलो, हे सगळे आठवले, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विमानतळावर राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्याम लाल गोयल तसेच सैन्यदलाचे अधिकारी उपस्थित होते.