अण्वस्त्र युद्ध नाहीच
By admin | Published: September 30, 2016 01:41 AM2016-09-30T01:41:25+5:302016-09-30T01:41:25+5:30
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील काही राजकीय नेते पाकिस्तान सरकारवर दबाव आणत आहेत. प्रतिकारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्यांत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मुहम्मद असिफ यांचाही समावेश आहे. भारताचा विनाश करण्याची हीच वेळ असल्याची भाषाही त्यांनी केली आहे. आमची अण्वस्त्रे देखाव्यासाठी नाहीत, असे व्यक्तव्यही त्यांनी मागच्याच आठवड्यात एका टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले होते. तथापि, दोन्ही देशांत अण्वस्त्र युद्ध भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळून लावली आहे.
यामागचे मुख्य कारण म्हणजे बिगर अण्वस्त्र पर्यायासंदर्भातील दोन्ही देशांमधील वाद अद्याप संपलेला नाही. आत्मघाती दहशतवादी पथके पाठवून पाकिस्तान भारताशी छुपे युद्ध करीत आहे. तथापि, या दहशतवादी संघटनांशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे पाकिस्तान वारंवार सांगत आला आहे. भारताकडून चाललेली १६० मिनिटांची ही मोहीम अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करण्याइतकीच मर्यादित होती. दरम्यान, भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा पार करून आपल्या क्षेत्रातील काही लोकांना मारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पण, अणुहल्ला करण्यासाठी पाकिस्तानला डिवचण्यासारखी ही कृती नाही.
पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचे टॅक्टीकल आणि स्ट्रॅटेजिक असे दोन प्रकार आहेत. टॅक्टिकलचे क्षेत्र हे १० किमीपर्यंतचेच आहे आणि यात २०० व्यक्ती मारण्याची क्षमता आहे. ०.३ किलो टन त्याचे वजन आहे. तर, स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअरचा हल्ला संपूर्ण शहराला लक्ष्य करू शकतो. १० किलो टन एवढे त्याचे वजन आहे.
जगात कोणत्याच देशाने अण्वस्त्रांचा युद्धातील डावपेचाचा भाग म्हणून वापर केलेला नाही हे येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे.