‘इंडिया’कडून ऑफर नाही; एनडीएसोबतच राहणार : चिराग पासवान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 06:02 AM2024-06-06T06:02:11+5:302024-06-06T06:02:36+5:30
बुधवारी सकाळी पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारमधील एनडीएच्या घटक पक्षांमधील भेटीगाठींना वेग आला आहे. आपल्याला इंडिया आघाडीकडून कोणतीही ऑफर आल्याचा इन्कार करताना लोक जनशक्ती पार्टी (रा)चे नेते चिराग पासवान यांनी एनडीएतील घटक पक्ष एकसंध असल्याचे स्पष्ट केले आहे.
बुधवारी सकाळी पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपण मुख्यमंत्र्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केल्याचे सांगून पासवान यांनी आजचा दिवस हा अभिनंदनाचा असल्याचे स्पष्ट केले. बिहारमध्ये आमची आघाडी मजबूत करण्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांच्याएवढेच मुख्यमंत्र्यांना जात असल्याचे ते म्हणाले.
एका नव्या पक्षाला व चिन्हाला एवढ्या कमी काळात नागरिकांनी स्वीकारले, ही अभिनंदनीय गोष्ट असल्याचे सांगून पासवान यांनी सरकारही एकत्रच बनवणार, याबाबत कोणताही संशय नसल्याचे स्पष्ट केले.