गेल्या १० वर्षांत भारतीयांनी किती काळा पैसा स्विस बँकेत ठेवला?; मोदी सरकारचं चक्रावून टाकणारं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:40 PM2021-07-27T12:40:05+5:302021-07-27T12:46:51+5:30
स्विस बँकेतील काळ्या पैशाशी संबंधित प्रश्नाला मोदी सरकारचं लोकसभेत उत्तर
नवी दिल्ली: परदेशातील बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा देशात आणल्यास प्रत्येकाला १५ लाख रुपये मिळतील, असा दावा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होण्याआधी केला होता. त्यानंतर देशात सत्तापरिवर्तन झालं. मात्र काळा पैसा देशात आणण्यात मोदी सरकारला यश आलेलं नाही. गेल्या १० वर्षांत भारतीयांनी किती काळा पैसा स्विस बँकांमध्ये जमा केला, या प्रश्नाला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींनी लिखित उत्तर दिलं. अर्थ राज्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं संसदेतले अनेक खासदार चक्रावले.
भारतीयांनी गेल्या १० वर्षांत स्विस बँकांमध्ये किती काळा पैसा जमा केला त्याची कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींनी लोकसभेत सांगितलं. गेल्या ५ वर्षांत काळा पैसा प्रकरणी १०७ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. काँग्रेस खासदार विन्सेंट पाला यांनी विचारलेल्या प्रश्नाला चौधरींनी उत्तर दिलं.
आतापर्यंत ८ हजार ४६५ कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीवर कर लावण्यात आला आहे. एचएसबीसी प्रकरणांमध्ये १ हजार २९४ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेशन जर्नलिस्टनं (आयसीआयजे) आतापर्यंत ११ हजार १० कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाची माहिती गोळा केल्याचं चौधरींनी सांगितलं.
पनामा पेपर्स लीक प्रकरणांतून जवळपास २० हजार ७८ कोटी रुपयांच्या अघोषित रकमेची माहिती मिळाली आहे. तर पॅराडाईज पेपर्स लीक प्रकरणांतून जवळपास २४६ कोटी रुपयांच्या अघोषित क्रेडिटचा तपशील मिळाला आहे, अशी माहिती चौधरींनी दिली. पनामा पेपर्स लीकमधून भारतासह जगभरातील अनेक प्रमुख व्यक्तींनी केलेली कर चोरी उघडकीस आली.