पसंतीने केलेला विवाह कोणी रोखू शकत नाही, कोलकाता उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 02:03 AM2020-12-24T02:03:32+5:302020-12-24T07:06:03+5:30
Kolkata High Court : न्या. संजीव बॅनर्जी व न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेसंदर्भात हा निर्णय दिला.
कोलकाता : जर सज्ञान व्यक्तीने तिच्या पसंतीने विवाह केला असेल व त्यासाठी स्वत:हून धर्मांतर केले असेल तर तिला कोणीही रोखू शकत नाही, असे मत कोलकाता उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
न्या. संजीव बॅनर्जी व न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेसंदर्भात हा निर्णय दिला. आपल्या १९ वर्षे वयाच्या मुलीला दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले, अशी याचिका त्या मुलीच्या पित्याने कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केली होती.
या पित्याने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले.
मी माझ्या मर्जीनुसार विवाह केला आहे, असा जबाब या मुलीने दिला. मात्र हा जबाब देताना माझी मुलगी दडपणाखाली नव्हती असे म्हणता येणार नाही, असा दावा तिच्या
पित्याने कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला
आहे. (वृत्तसंस्था)
दडपणाखाली नसल्याची खात्री करा
कोलकाता उच्च न्यायालयाने असा आदेश दिला की, सज्ञान मुलीने पश्चिम बंगालमधील
तेहत्ता येथील सर्वांत वरिष्ठ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर होऊन तिथे पुन्हा आपला जबाब द्यावा.
त्या वेळी ती कोणत्याही दडपणाखाली नाही याची खात्री करून घेण्यात यावी. तिच्या वडिलांच्या संशयाचे निराकरण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.