भारताला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही - अनुपम खेर
By admin | Published: November 7, 2015 10:38 AM2015-11-07T10:38:46+5:302015-11-07T12:41:30+5:30
प्रत्येक देशाला कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, पण म्हणून कोणालाही आपल्या देशाला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार नाही, असे अभिनेता अनुपम खेर यांनी स्पष्ट केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - प्रत्येक देशाला कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, पण म्हणून कोणालाही आपल्या देशाला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार नाही, असे अभिनेता अनुपम खेर यांनी स्पष्ट केले. देशातील असहिष्णू वातावरणाच्या विरोधात अनेक साहित्यिक, लेखक, दिग्दर्शकांनी चालवलेल्या 'पुरस्कार वापसी' मोहिमेचा तीव्र शब्दात निषेध करणारे अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या समर्थनार्थ आज राजधानी दिल्लीत 'मार्च फॉर इंडिया'चे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय संग्रहालयापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात दिग्दर्शक मुधर भांडरकर, तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसह सुमारे दोन हजार जण सहभागी झाले होते. शंखनाद करत भारत माता की जय, मार्च फॉर इंडिया, इंडिया इज टॉलरन्ट अशा घोषणांनी या मार्चला सुरूवात झाली. मात्र अशा घोषणा न देण्याचे आवाहन खेर यांनी उपस्थितांना केले.
मोर्चाला सुरूवात करण्यापूर्व खेर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण सर्व धर्मनिरपेक्ष आहोत, आपला दांभिक निधर्मीपणावर विश्वास नाही. जे लोक पुरस्कार परत करत आहेत, त्यांना १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीत असहिष्णूता दिसली नव्हती का असा सवाल खेर यांनी विचारला. आपण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन देशात सहिष्णुता असल्याचे सांगणार असल्याचेही खेर म्हणाले.
पुरस्कार वापसी ही राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याची जाहीर टीका करणारे अभिनेता अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचे घोषित केले होते. पुरस्कार वापसी ही भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करण्यासाठी केलेले षडयंत्र असल्याची टीका खेर यांनी केली होती.