हरयाणात एकालाही ७२० गुण नाहीत... 'नीट-यूजी'च्या निकालात दृश्य बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 06:26 AM2024-07-21T06:26:10+5:302024-07-21T06:26:22+5:30

'एनटीए'ने पुन्हा निकाल जाहीर करताना परीक्षार्थ्यांची ओळख उघड केली नाही. तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 'एनटीए'ला दिले होते.

No one in Haryana has 720 marks... A visual change in 'NEET-UG' results | हरयाणात एकालाही ७२० गुण नाहीत... 'नीट-यूजी'च्या निकालात दृश्य बदल

हरयाणात एकालाही ७२० गुण नाहीत... 'नीट-यूजी'च्या निकालात दृश्य बदल

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली: यंदा ५ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेचा केंद्र व शहरनिहाय निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी जाहीर केला. याआधी या परीक्षेचा ५ जून रोजी निकाल जाहीर झाला होता; पण परीक्षेतील गैरप्रकारांमुळे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा वेगळ्या पद्धतीने निकाल जाहीर करण्याचे आदेश 'एनटीए'ला दिले होते. हरयाणातील नीट-यूजी परीक्षेच्या एका केंद्रात याआधी ७२० पैकी ७२० गुण मिळालेले सहा विद्यार्थी होते. मात्र, पुन्हा जाहीर केलेल्या निकालात त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ६८२च्या पुढे गुण मिळविता आलेले नाहीत.

'एनटीए'ने पुन्हा निकाल जाहीर करताना परीक्षार्थ्यांची ओळख उघड केली नाही. तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 'एनटीए'ला दिले होते. गैरप्रकार झाल्याचे आरोप असलेल्या केंद्रांत इतर केंद्रांपेक्षा किती जास्त गुण मिळाले, ही माहिती कळण्यासाठी अशा पद्धतीने सुधारित निकाल जाहीर करण्यात आले.

बिहारमध्ये काय?
बिहारमधील हजारीबाग येथील ओअॅसिस पब्लिक स्कूलच्या निकालांमध्ये वेगळे चित्र आढळले. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी ओअॅसिस पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपलला अटक झाली होती. त्या केंद्रात ७०१ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ओअॅसिस पब्लिक स्कूलमधील केंद्रात ७०० पेक्षाही कमी सर्वोच्च गुण मिळाले. सात विद्यार्थ्यांना ६५०हून अधिक, २३ विद्यार्थ्यांना ६००हून जास्त, ४६ विद्यार्थ्यांना ५५०हून जास्त गुण मिळाले आहेत.

जलाराम स्कूलमध्ये पाच जणांना ६५०हून अधिक गुण
गुजरातच्या गोध्रा येथील जलाराम इंटरनॅशनल स्कूलमध्ये परीक्षेला १,८३८ विद्यार्थी बसले होते. तिथे ७०० पेक्षाही कमी सर्वोच्च गुण मिळाले, पाच विद्यार्थ्यांना ६५०हून अधिक, १४ जणांना ६००हून जास्त, ३१ जणांना ५५०हून अधिक गुण मिळाले आहेत.

अहमदाबादमध्ये १२ विद्यार्थ्यांना ७००हून अधिक गुण
अहमदाबाद येथील परीक्षा केंद्रात नीट-यूजी परीक्षेत याआधी ६७६ पैकी १२ विद्यार्थ्यांनी ७००पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सोमवारी नीट-यूजी याचिकांच्या सुनावणीप्रसंगी उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

आता सोमवारी सुनावणी
फेरपरीक्षा घ्यावी या मागणीसाठी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी, २२ जुलै रोजी सुनावणी होईल. या परीक्षेचा केंद्र, शहरनिहाय जो निकाल जाहीर करण्यात आला, त्यातून नेमके काय निष्कर्ष हाती आले. यावर आता विचार होण्याची शक्यता आहे.

Web Title: No one in Haryana has 720 marks... A visual change in 'NEET-UG' results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.