"खर्गे-फर्गेंना कोणीही ओळखत नाही, नितीश कुमार यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार करा',
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 07:29 PM2023-12-22T19:29:38+5:302023-12-22T19:32:11+5:30
जेडीयूच्या आमदाराचे भरसभेत विधान; INDIA आघाडीत वादाची नवी ठिणगी?
Mallikarjun Kharge Nitish Kumar INDIA PM post : एकीकडे INDIA ही विरोधकांची आघाडी एका छत्राखाली विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे या पक्षांमध्ये सतत नवनवी तेढ निर्माण होऊन विरोधी आघाडीत संघर्षाची ठिणगी पडताना दिसत आहे. INDIA आघाडीत बरेच स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहेत त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत बोलताना जेडीयू कडून अनेकवेळा आपले नेते नितीश कुमार यांचे नाव घेण्यात आले आहे. तशातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव यात घेतले जात आहे. या दरम्यान, खर्गेंना कोणी ओळखत नाही, नितीश कुमारचपंतप्रधानपदाचे उमेदवार असे विधान जेडीयूचे आमदार गोपाल मंडल यांनी केले आहे.
गोपाल मंडल यांनी नितीश कुमार यांना पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांकडे दुर्लक्ष करत त्यांनी नितीशकुमार यांचे नाव आणि चेहरा निर्विवाद आहे असे सांगितले. त्यामुळेच त्यांची पंतप्रधानपदी निवड करावी, असेही त्यांनी सुचवले. तसेच, खर्गे यांना कोणी ओळखत नाही, असे आक्रमक विधान त्यांनी केले.
जेडीयूचे आमदार गोपाल मंडल यांनी एका संभाषणात नितीश कुमार यांचे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "नितीश कुमार यांचे नाव आणि चेहरा निर्विवाद आहे आणि त्यामुळेच त्यांची पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवड झाली पाहिजे. काँग्रेसला आता तितके वजन उरले नाही. काँग्रेसमुळेच भाजपची सत्ता आली आहे. काँग्रेसला तोच धंदा करायचा आहे. त्यामुळे या पक्षावर विश्वास ठेवता येणार नाही."
"जनता खर्गे फर्गेंना जास्त ओळखत नाही. आपणही त्यांना ओळखत नाही. आता तुम्ही लोकांनी त्यांचे नाव सांगितले तेव्हा आम्हाला कळले की ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. खर्गे यांना कोणी ओळखत नाही. नितीश पंतप्रधानदाचे उमेदवार असतील कारण नितीश कुमार यांना सर्वजण ओळखतात", असे ते म्हणाले.