जगातील कुणीही भारताची एक इंचही जमीन घेऊ शकत नाही - राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 06:44 AM2020-07-18T06:44:06+5:302020-07-18T06:44:35+5:30
लुकुंगमध्ये सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पूर्व लडाखमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे; पण मी याची खात्री देऊ शकत नाही की, यातून समाधान निघेल.
लुकुंग (लडाख) : जगातील कोणतीही ताकद आमची एक इंचही जमीन घेऊ शकत नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी शेजारी देशाला खडसावले. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह हे लडाखमध्ये दाखल झाले.
लुकुंगमध्ये सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पूर्व लडाखमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे; पण मी याची खात्री देऊ शकत नाही की, यातून समाधान निघेल. पेंगोंग सरोवराजवळ एका सैन्य चौकीवर बोलताना ते म्हणाले की, १५ जून रोजी भारताचे २० जवान शहीद झाले होते. आम्ही आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. यावेळी त्यांच्यासोबत सैन्य दल प्रमुख जनरल बिपीन रावत व जनरल एम.एम. नरवणे उपस्थित होते. संरक्षणमंत्र्यांनी एका ठिकाणी सैन्य सरावाची पाहणी केली.