यंदा कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 03:30 AM2020-12-16T03:30:23+5:302020-12-16T03:30:35+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ जानेवारीपासून
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अभूतपूर्व अशा कोविड महामारीमुळे यावर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाची माहिती सरकारने राजकीय पक्षांच्या नेत्यांना देताना सांगितले की, गेल्या काही दिवसांत विशेषत: दिल्लीत कोरोनाचे रुग्ण अचानक वाढल्यामुळे हिवाळ्याचे महिने हे महामारीच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.
सरकारने अनौपचारिकरित्या अनेक विरोधी नेत्यांना सांगितले की, यापूर्वी १९७५, १९७९ आणि १९८४ मध्ये राज्यसभेचे हिवाळी अधिवेशन काही विशिष्ट परिस्थितीमुळे घेतले गेलेले नाही. वर्ष २०२० हे जागतिक पेचप्रसंगाचे साक्षीदार बनले आहे आणि कोरोनावरील लस लवकरच अपेक्षित असल्याने सरकारने सभागृह नेत्यांशी चर्चेनंतर हिवाळी अधिवेशन घ्यायचे नाही, असा निर्णय घेतला.
सरकार ठाम
अधिर रंजन चौधरी यांच्याशिवाय अनेक प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना हिवाळी अधिवेशन भलेही ते छोटे का असेना परंतु, घेतले गेले पाहिजे, असा आग्रह केला होता. सरकारने विशिष्ट व्यवस्था केलेली असल्यामुळे दोन नेत्यांनी तर संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन घेतले जाऊ शकते, अशी सूचना केली आहे; परंतु सरकारने या सूचनेला स्वीकारले नाही.
सरकारमधील सूत्रांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, संसद अधिवेशनाच्या नेमक्या तारखेचा निर्णय संसदेवरील मंत्रिमंडळ समिती घेईल. ते २७ जानेवारीपासून घेतले जाण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू झाले होते. केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल.