प्लाझ्मा दान केल्यावर विमानाचे भाडेही घेतले नाही, राहुल राज यांचा बंगळुरू ते दिल्ली प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 01:03 AM2021-04-17T01:03:56+5:302021-04-17T06:44:16+5:30
plasma : राज दिल्लीत रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित एका अज्ञात रुग्णाचा जीव वाचवा म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी बंगळुरूहून दिल्लीला आले.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची वाढती संख्या काळजी वाढवत असली तरी माणुसकीचेही दुर्लभ दर्शन घडत आहे व ते घडवले आहे, बंगळुरूचे राहुल राज यांनी.
राज दिल्लीत रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित एका अज्ञात रुग्णाचा जीव वाचवा म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी बंगळुरूहून दिल्लीला आले. प्लाझ्मा थेरेपी मिळाल्यानंतर त्या रुग्णाच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. दिल्लीतील विजय यांची आई ऊर्मिला कोरोनाबाधित असून त्यांना नऊ एप्रिल रोजी मणिपाल रुग्णालयात दाखल केले गेले. प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरने प्लाझ्मा थेरेपीसाठी एबी पॉझिटिव्ह प्लाझ्माची तरतूद करण्यास सांगितले. बरेच प्रयत्न केल्यावरही दिल्लीत प्लाझ्मा दाता (डोनर) मिळाला नाही. त्यानंतर सोशल मीडियावर आवाहन केले.
तात्काळ संपर्क
- युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी सोशल मीडियावरील वरील आवाहन वाचून बंगळुरूमध्ये राहणारे याच रक्तगटाचे राहुल राज यांच्याशी संपर्क साधला.
- राहुल म्हणाले की, जेव्हा मला समजले की, माझ्या प्लाझ्माची दिल्लीतील कोणा रुग्णाला तातडीची गरज आहे. दुसऱ्या दिवशी मी बंगळुरूहून विमानाने थेट दिल्लीतील द्वारकास्थित मणिपाल रुग्णालयात दाखल झालो.
- राहुल राज यांनी प्लाझ्मा दान केला व ते परत बंगळुरूला निघाले. विजय यांनी सांगितले की राहुल यांनी विमान भाड्याचेही पैसे घेतले नाहीत.