आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 03:51 PM2024-12-01T15:51:18+5:302024-12-01T15:52:53+5:30
यासंदर्भात शनिवारी टीटीडीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
Tirumala temple : आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिर परिसरात खास इशारा देण्यात आला आहे. भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे संरक्षक तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) तिरुमलामध्ये राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घातली आहे. अलीकडील घटना लक्षात घेता राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे टीटीडीने सांगितले.
यासंदर्भात शनिवारी टीटीडीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. राजकारण्यांसह काही लोकांनी दर्शनानंतर मंदिर परिसराजवळ मीडियासमोर राजकीय किंवा प्रक्षोभक विधाने केली होती. त्यामुळे येथील आध्यात्मिक शांतता भंग पावली आहे, असे टीटीडीने म्हटले आहे. तसेच, मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिक शांततेचे रक्षण करण्यासाठी द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे टीटीडीने म्हटले आहे.
याचबरोबर, सर्वांना या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन टीटीडीने केले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. दरम्यान, हा नियम बऱ्याच काळांपासून लागू आहे. उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव एल.व्ही.सुब्रमण्यम यांनी सांगितले. सुब्रमण्यम यांनी टीटीडीचे कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.