अनेक दशकांपासून वीजपुरवठाच नाही, राॅकेलवर अवलंबून; राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या गावात अंधार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:25 AM2022-06-27T10:25:39+5:302022-06-27T10:26:53+5:30
Draupadi Murmu : उपरबेडा गावाची लाेकसंख्या ३ हजार ५०० एवढी आहे, तर डुंगूरशाही गावात जेमतेम २० कुटुंबे राहतात. डुंगूरशाही गावात माेबाईल पाेहाेचला. ग्रामस्थ माेबाईलचा वापर करताना दिसतात; मात्र ताे चार्ज करण्यासाठी जवळपास एक किलाेमीटर अंतरावर असलेल्या बडाशाही खेड्यात जावे लागते.
बारीपाडा : राष्ट्रपतिपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्राैपदी मुर्मू यांचे मूळ गाव गेली अनेक वर्षांपासून अंधारत असल्याचे उघड झाले आहे. मयूरगंज जिल्ह्यातील उपरबेडा या गावातील डुंगूरशाही नावाचे खेडे हे मुर्मू यांचे मूळ गाव आहे. डुंगूरशाही गावात माेबाईल पाेहाेचला. परंतु, वीज पाेहाेचण्यासाठी अनेक दशके वाट बघावी लागत आहे. तेथील ग्रामस्थांना राॅकेलवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, उपरबेडा गावातील बडाशाही या हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड्यात वीज असून, डुंगूरशाही हे खेडे मात्र वंचित आहे.
उपरबेडा गावाची लाेकसंख्या ३ हजार ५०० एवढी आहे, तर डुंगूरशाही गावात जेमतेम २० कुटुंबे राहतात. डुंगूरशाही गावात माेबाईल पाेहाेचला. ग्रामस्थ माेबाईलचा वापर करताना दिसतात; मात्र ताे चार्ज करण्यासाठी जवळपास एक किलाेमीटर अंतरावर असलेल्या बडाशाही खेड्यात जावे लागते. घरांमध्ये प्रकाशासाठी लाेकांना राॅकेलच्या दिव्यांवर विसंबून राहावे लागते. (वृत्तसंस्था)
प्रशासन खडबडून झाले जागे
प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत बातम्या झळकल्यानंतर ओडिशा प्रशासन खडबडून जागे झाले. गावात वीजपुरवठा देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. विजेचे खांब, ट्रान्स्फाॅर्मर आदी साहित्य घेऊन अधिकारी गावात दाखल झाले.
आमदार, खासदारांचे दुर्लक्ष
मुर्मू यांचा भाचा बैरांची तुडू हे अजूनही कुटुंबीयांसह डुंगूरशाही खेड्यात राहतात. वीजपुरवठ्यासाठी अनेक लाेकांना आम्ही बाेललाे. मात्र, काेणीही त्याकडे लक्ष दिले नाही, असे बैरांची यांच्या पत्नी सांगितले. मुर्मू यांना याबाबत आम्ही कधीही सांगितले नसल्याचे त्या म्हणाल्या.
वीजपुरवठ्यासाठी वनकायद्याची अडचण
डुंगूरशाही खेडे वनजमिनीवर वसलेले आहे. त्यामुळे तेथे वीजपुरवठ्यासाठी वनकायद्याची अडचण हाेती, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.