कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 08:06 PM2021-02-03T20:06:22+5:302021-02-03T20:09:00+5:30
रिहाना, ग्रेटा थनबर्गसारख्या व्यक्तींनीही केलं होतं शेतकरी आंदोलनावरून ट्वीट
देशात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली.. शेतकरी आंदोलनाबाबत कोणत्याही प्रकारची टीका किंवा ट्वीट करण्यापूर्वी त्या प्रकरणाचं सत्य जाणून घेणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील त्यांच्या ट्वीटवर रिप्लाय देत कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचं ऐक्य तोडू शकत नसल्याचं म्हटलं.
"कोणताही दुष्प्रचार देशाचं ऐक्य तोडू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताला विकासाची उची गाठण्यापासून रोखू शकत नाही, दुष्प्रचार हा भारताचं भवितव्य ठरवू शकत नाही केवळ विकास ते ठरवू शकतो. भारत एकसंध आहे आणि एकसंध राहूनच विकासकडे वाटचाल करेल," असं ट्वीट अमित शाह यांनी केलं. यापूर्वी पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावर उत्तरही देण्यात आलं होतं.
No propaganda can deter India’s unity!
— Amit Shah (@AmitShah) February 3, 2021
No propaganda can stop India to attain new heights!
Propaganda can not decide India’s fate only ‘Progress’ can.
India stands united and together to achieve progress.#IndiaAgainstPropaganda#IndiaTogetherhttps://t.co/ZJXYzGieCt
काय म्हटलं होतं परराष्ट्र मंत्रालयानं ?
"अशा प्रकरणांवर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करण्यापूर्वी तथ्य जाणून घंणं आवश्यक आहे, तसंच याबाबत अधिक समज असणंही आवश्यक आहे. या प्रकरणी प्रसिद्ध व्यक्तींकडून आणि अन्य व्यक्तींकडून सोशल मीडियावर हॅशटॅगचा होत असलेला वापर आणि तसंच जी काही वक्तव्य केली जात आहेत ती योग्य नाही आणि बेजबाबदारपणाची आहेत," असं अनुराग श्रीवास्तव यांनी ट्वीट केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.. संसदेत पूर्ण चर्चा करण्यात आल्यानंतरच कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी हे कायदे पारित करण्यात आय़ले आहे. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसंच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. या नव्या कायद्यांबाबत फार कमी लोकांमध्ये असंतोष असल्याचंही या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. "आंदोलकांच्या भावनांचा आदर करत सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांकडून आतापर्यंत ११ वेळा बैठक घेण्यात आली. सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्यांना हा कायदा तात्पुरता रोखून ठेवण्याचा पर्याय देखील दिला आहे," असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
ग्रेटा थनबर्गनेकडून समर्थन
रिहानानंतर आता स्विडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असं तिनं म्हटलं होतं.
रिहानंनंही केलं ट्वीट
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध पॉप सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितलं आहे. रिहानाने या बातमीसोबत बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही? #FarmersProtest. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे.