ना पाऊस, ना गारपीट, आता फक्त थंडीच!, पुढील आठवडाही राहणार गुलाबीच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 07:55 AM2022-01-01T07:55:42+5:302022-01-01T07:56:11+5:30
cold : महाराष्ट्राशेजारील गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश राज्यात पुढील आठवड्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवेल.
मुंबई/नवी दिल्ली : देशाच्या काही भागांत सध्या जोरदार थंडी पडली आहे, तर तामिळनाडू व आसपासच्या भागांत पावसाचे थैमान सुरू आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पुढील संपूर्ण आठवडा (६ जानेवारी २०२२ पर्यंत) ना पाऊस, ना गारपीट, तर केवळ फक्त थंडीच राहणार आहे. त्यामुळे शेतकरी व सवर्वसामान्य लोक आनंदात आहेत. भलत्या वेळी पावसाचा वा गारपीटीचा त्रास नसल्याचे समाधान आहे, असे अनेक शेतकरी मंडळींनीही बोलून दाखविले.
थंडीचा रबी पिके तसेच उन्हाळ (गावठी) पेर व लागवड केलेल्या कांद्याना फायदा होत आहे. तसेच चालू असलेल्या उन्हाळ कांदा लागवडीला नजीकच्या काळात वातावरणाचा कोणताही अडथळा जाणवणार नाही. मुंबईसह उपनगरी भागातही पुढील आठवड्यात किमान तापमान १३-१४ डिग्री पर्यंत तर कमाल तापमान २६-२७ डिग्रीपर्यंत घट येऊन चांगली थंडी जाणवू शकते.
महाराष्ट्राशेजारील गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश राज्यात पुढील आठवड्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवेल. पुढील आठवड्यात संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट व दाट धुके व त्यातून सकाळच्या वेळेत खालावलेली दृश्यता अशा वातावरणीय घडामोडीची उलथापालथ होऊ शकते. या वातावरणीय घडामोडीमुळे महाराष्ट्रात चांगली थंडी पडू शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
सध्या वायव्य तसेच उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीचा कहर सुरू आहे. राजधानी दिल्लीच्या पालम भागात शुक्रवारी तापमान ४ अंशांच्या आसपास होते. सफदरजंग भागातही ते १० अंश होते. त्यामुळे दिल्लीकर कुडकुडताना दिसत होते. हीच स्थिती उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाबमध्ये होती. काश्मीर, हिमाचल प्रदेंश आणि उत्तराखंडात तर सध्या बर्फवृष्टी आहे.
त्या मानाते महाराष्ट्रातील थंडी बरीच सुसह्य आहे. ग्रामीण भागांत व शेतांमध्ये चांगलाच गारवा जाणवत असला तरी ही थंडी गुलाबी म्हणावी अशीच आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत स्वेटर, शाली, गमछे दिसत असले तरी मुंबईसारख्या शहरांत मात्र फारच किरकोळ थंडी आहे. त्यामुळे स्वेटर व शाली अद्याप तरी बाहेर आलेल्या नाहीत.