केलेल्या ट्विटबद्दल पश्चात्ताप नाही, प्रशांत भूषण यांचे कोर्टात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 04:56 AM2020-08-21T04:56:32+5:302020-08-21T04:56:38+5:30
प्रत्येक सुबुद्ध नागरिकाचे कर्तव्य आहे व तेच कर्तव्य मी पार पाडले आहे, असे ठाम निवेदन वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केले आहे.
नवी दिल्ली : ज्या दोन टष्ट्वीटबद्दल न्यायालयाने मला ‘कन्टेम्प्ट’साठी दोषी ठरविले आहे ती टष्ट्वीट मी अजिबात बेसावधपणे केलेली नव्हती. त्यात मी माझी प्रामाणिक मनोधारणा व्यक्त केली होती व आजही माझी तीच मते कायम आहेत. देशाची संवैधानिक व्यवस्था सध्या नाजूक वळणावर आहे व तिचे पतन रोखण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक सुबुद्ध नागरिकाचे कर्तव्य आहे व तेच कर्तव्य मी पार पाडले आहे, असे ठाम निवेदन वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केले आहे.
विद्यमान सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या एकूणच कारभाराबद्दल जून महिन्याच्या अखेरीस केलेल्या दोन टष्ट्वीटबद्दल न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने भूषण यांना गेल्या आठवड्यात दोषी ठरविले होते. भूषण यांच्यावतीने ज्येष्ठ वकील डॉ. राजीव धवन यांनी युक्तिवादही केला. परंतु शिक्षेवरील सुनावणी तहकूब ठेवण्यास नकार देत खंडपीठाने भूषण यांना सांगितले की, आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आम्ही तुम्हाला शिक्षा फर्मावली तरी तुम्ही करणार असलेल्या फेरविचार अर्जाचा फैसला होईपर्यंत ती शिक्षा अंमलात आणली जाणार नाही, अशी आम्ही व्यवस्था करू.