केजरीवाल यांना दिलासा नाही, पत्नी सुनीता सक्रिय? आपच्या मंत्री, आमदारांकडून विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 07:20 IST2024-04-16T07:19:46+5:302024-04-16T07:20:10+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असले तरी पंजाबमधील व्यस्ततेमुळे जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत.

केजरीवाल यांना दिलासा नाही, पत्नी सुनीता सक्रिय? आपच्या मंत्री, आमदारांकडून विनवणी
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने आम आदमी पक्षाला अस्तित्वाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या पत्नी राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असले तरी पंजाबमधील व्यस्ततेमुळे जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत. खासदार संजय सिंह हे पक्षाचे नेते आहेत. मात्र, या प्रकरणात ईडीनंतर सीबीआय कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनीता केजरीवाल यांचा थेट राजकारणात प्रवेश पक्षाला आधार ठरू शकतो. दरम्यान, कोर्टान केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली.
मुख्यमंत्री की सहसंयोजक
केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. आपच्या मंत्र्यांसह अनेक आमदार सुनीता यांची नियमित भेट घेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे वा पक्षाचे सहसंयोजक व्हावे, असे मत व्यक्त केले.