अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, कोर्टाने १ एप्रिलपर्यंत सुनावली ईडी कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:45 PM2024-03-28T16:45:14+5:302024-03-28T16:45:37+5:30
Arvind Kejriwal News: कथित मद्यघोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना कुठलाही दिलासा न देता त्यांच्या ईडी कोठडीमध्ये चार दिवसांनी वाढ केली आहे.
कथित मद्यघोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना कुठलाही दिलासा न देता त्यांच्या ईडी कोठडीमध्ये चार दिवसांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता १ एप्रिलपर्यंत केजरीवाल यांना ईडीच्या ताब्यात राहावे लागणार आहे. १ एप्रिल रोजी केजरीवाल यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात २०२२ मध्ये सीबीआयने एक खटला दाखल केला होता. त्यानंतर ईसीआयआर दाखल झाली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. तसेच त्यांना कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.
कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, मला अटक करण्यात आली आहे. माझ्यावर कुठलाही खटला चालवण्यात आला नाही. तसेच माझ्यावरील आरोपही सांगण्यात आलेले नाहीत. तपासात आतापर्यंत सहकार्य करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. ईडीने आतापर्यंत ३१ हजार पानांची कागदपत्रे गोळा केली आहेत. त्यात माझा केवळ चार जबाबांमध्ये उल्लेख आहे. त्यात मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत काही कागदपत्रं देण्यात आली, असं म्हटलंय. मात्र माझ्या घरी आमदारांसह अनेक लोक येत असतात. आता ते काय बोलत असतील, याबाबत मला कसं काय समजणार. केवळ हे विधान मला अटक करण्यासाठी पुरेसं आहे का, असा सवालही अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.
त्यावर कोर्टाने त्यांना तुम्ही हे सारं लिहून का देत नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, मी कोर्टामध्ये बोलू इच्छितो. ईडीच्या या संपूर्ण तपासाचे दोन उद्देश आहेत. त्यातील पहिला हा आम आदमी पक्षाला संपवण्याचा आहे. तर दुसरा भाजपाला देणगी मिळवून देणे हा आहे. दिल्लीमधील मद्य धोरण ठरवण्यामध्ये कुठलाही घोटाळा झालेला नाही. तसेच तिच्या अंमलबजावणीमध्येही झालेला नाही. तर घोटाळा हा ईडीच्या तपासामध्ये झाला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.