रेल्वे डब्यांवर आरक्षित आसनांचा तक्ता चिकटवणं होणार बंद, प्लॅटफॉर्मवर बसविणार डिजिटल स्क्रीन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 08:08 AM2018-02-17T08:08:18+5:302018-02-17T10:40:53+5:30
प्लॅटफॉर्मवर डिजिटल डिस्प्लेद्वारे आरक्षित आसनांचा तक्ता प्रसिद्ध केला जाणार आहे.
नवी दिल्ली- रेल्वे प्रवासासाठी रिजर्व्हेशन केल्यानंतर प्रवासाच्या आधी एक्स्प्रेस ट्रेनवर आसनांचा तक्ता चिकटवला जातो. प्रवास करण्याच्या आधी ट्रेन स्थानकावर आल्यानंतर आधी तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांना ट्रेनवर लावलेला तो तक्ता पाहावा लागतो. पण आता रेल्वे डब्यांवर आरक्षित आसनांचा तक्ता चिकटवणं बंद होणार आहे. त्याऐवजी रेल्वे स्थानकातील ज्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येणार असेल त्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल डिस्प्लेद्वारे हा तक्ता प्रसिद्ध केला जाणार आहे. रेल्वे स्टेशनवर लावलेल्या प्लाझ्मा स्क्रीनवरील यादीत प्रवाशांना त्यांचं नाव पाहता येणार आहे.
रेल्वेकडून सुरू करण्यात येणारी ही प्रायोगिक योजना असून सुरुवातीला ती सहा महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे. येत्या १ मार्च २०१८ या तारखेपासून हा नवा बदल करण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाने आपल्या संबंधीत विभागीय कार्यालयांना दिल्या आहेत. देशभरातील A1, A आणि B दर्जाच्या रेल्वेस्थानकांवरच हा प्रयोग केला जाणार आहे.
रेल्वेच्या माहितीनुसार या तीन श्रेणीच्या एकुण स्थानकांची संख्या जवळपास 400 आहे. यामध्ये दिल्लीतील सहापेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा सहभाग आहे. रेल्वेकडून याधी अशा प्रकारचा प्रयोग नवी दिल्ली रेल्वे स्थानक, हजरत निझामुद्दीन स्थानकासह देशातील विविध शहारांमधील सहा स्टेशनवर करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर रेल्वेकडून जवळपास 400 रेल्वे स्थानकावरील कागदी तक्ता चिकटविण्याचं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रेल्वे स्थानकावर आरक्षित आसनांचा कागदी तक्ता चिकटवणं बंद करून त्याजागी प्लाझ्मा डिस्प्ले लावणं प्रवाशांच्या सोयीचं होईल. प्रवासासाठीचा आसन क्रमांक त्यांना नीट पाहता येईल. याशिवाय बऱ्याचदा डब्यांवर लावलेला तक्ता फाडल्याचा प्रकार पाहायला मिळतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, ही परिस्थिती उद्भवणार नसल्याचं रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.