सासऱ्याच्या मालमत्तेवर जावयाचा काहीही हक्क नाही; केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:49 AM2021-10-07T08:49:42+5:302021-10-07T08:50:02+5:30
सासऱ्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असल्याचा दावा करतो हे लाजिरवाणे आहे, असे खडे बोल केरळ उच्च न्यायालयाने जावई डेव्हिसला सुनावले आहेत.
कोची : सासऱ्याच्या मालमत्तेत जावयाला कोणताही कायदेशीर हक्क नसतो तसेच तो तसा दावाही करू शकत नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. हेंद्री थॉमस या सासऱ्याच्या मालमत्तेवर त्यांचा जावई डेव्हिस राफेल यांनी हक्क सांगितला होता. या प्रकरणात डेव्हिस यांनी दाखल केलेल्या याचिकेत, त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिला. आता उच्च न्यायालयानेही डेव्हिस यांच्या विरोधात निकाल दिला आहे.
आपल्या मालकीच्या वास्तूत प्रवेश करण्यास न्यायालयाने जावई डेव्हिस याला कायमस्वरूपी मनाई केली आहे असे हेंद्री याने न्यायालयाला सांगितले. सेंट पॉल चर्चच्या वतीने फादर जेम्स नाझरेथ यांनी गिफ्ट डीडद्वारे काही मालमत्ता आपल्या नावावर केली होती असा दावा हेंद्री थॉमस यांनी केरळ उच्च न्यायालयात केला. स्वत:च्या पैशाने मी त्या जमिनीवर घर बांधले व आता तिथे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहात आहे. या मालमत्तेवर जावयाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही असा युक्तिवाद हेंद्री थॉमसद्वारे न्यायालयात करण्यात आला होता.
जावयाचे कृत्य लाजिरवाणे
सासरे हेंद्री थॉमस यांच्या एकुलत्या एक मुलीशी लग्न झाल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरातील सदस्य म्हणून स्वीकारले असे जावई डेव्हिस सांगतो. तसेच त्या आधारे सासऱ्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असल्याचा दावा करतो हे लाजिरवाणे आहे, असे खडे बोल केरळ उच्च न्यायालयाने जावई डेव्हिसला सुनावले आहेत.