रनवे दिसेना, लँडिंग करू कुठे? पायलट्सना नव्हता धुक्याचा अनुभव; दिल्लीत १३४ विमाने लेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 05:58 AM2023-12-29T05:58:32+5:302023-12-29T05:58:47+5:30
६० विमाने दुसऱ्या शहरांत उतरवली; उत्तर प्रदेशातील ३२ जिल्ह्यांत अलर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्याबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. नवीन पायलट्सना धुक्याचा अनुभव नसल्याने रनवे कुठे आहे, हेच त्यांना कळत नव्हते. सावधगिरी म्हणून ६० विमाने दिल्ली ऐवजी दुसऱ्याच शहरात उतरवण्यात आली. तर दिल्ली विमानतळावर १३४ विमानांना उशीर झाला. याशिवाय २२ रेल्वे ८ ते १० तास उशिराने धावत होत्या.
२८ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सफदरजंगमध्ये ५० मीटर व पालममध्ये २५ मीटर दृश्यमानता नोंदवण्यात आली. पंजाब आणि हरयाणात सकाळी धुके कायम होते.
थंडीची लाट पसरल्याने काश्मीरच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान उणे तीन अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे, तर पंजाब-हरयाणाला मात्र दिलासा मिळाला. श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री किमान तापमान उणे ३.३ अंश, गुलमर्ग येथे उणे २.६, काझीगुंड येथे उणे ३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उत्तर प्रदेशात ३२ जिल्ह्यांमध्ये धुक्याचा रेड अलर्ट आहे.
या शहरांमध्ये दृश्यमानता काही ठिकाणी शून्य आणि काही ठिकाणी ५-१० मीटरपर्यंत पोहोचली आहे. ५ जिल्ह्यांतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी मध्य प्रदेशातील ६ शहरांमध्ये गारपिटीची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये धुक्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात १७ जणांना आपला जीव गमवावा लागला.