CoronaVirus News: लस घेण्याची घाई नाही; ६९ टक्के भारतीयांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:00 AM2020-12-18T02:00:06+5:302020-12-18T02:00:17+5:30
कोरोनाची लस घेण्यास संकोच
मुंबई : कोरोना लस दृष्टिपथात येत असताना ती घेण्याबाबत लोकांच्या मनातील संकोच वाढताना दिसत आहे. लोकल सर्कलने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ६१ टक्के लोकांनी लस घेण्याची घाई करणार नाही, असे मत व्यक्त केले होते. त्याच मुद्द्यावर नव्याने केलेल्या सर्वेक्षणात ६९ टक्के लोकांनी साशंकता व्यक्त केली आहे.
लोकल सर्कलच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपासून सर्वेक्षण केले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात ६१, नोव्हेंबर महिन्यात ५९ टक्के लोकांनी लस घेण्यास साशंकता व्यक्त केली होती. त्यात आता वाढ झाल्याचे अधोरेखित होत आहे. ही लस घेण्यासाठी तीन ते सहा महिने थांबण्याची तयारी असल्याचे २७ टक्के लोकांनी सांगितले आहे.
६ ते १२ महिने थांबण्याची १५ टक्के लोकांची तयारी आहे. सहा टक्के लोकांना लस घेण्याची गरजच वाटत नाही, तर १३ टक्के लोकांना याबाबतचा निर्णय घेता येत नाही.
कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे मत ३३ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. हर्ड इम्युनिटी निर्माण झाल्याचे १४ टक्के लोकांचे म्हणणे असून मुळातच भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने कोरोनाचा फैलाव एका मर्यादेपेक्षा जास्त झाला नसल्याचे ८ टक्के लोकांना वाटते. कोरोना विषाणूची शक्ती घटल्याचे १५ टक्के लोकांचे म्हणणे असून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिणामकारक ठरत असल्याची ८ टक्के लोकांची भावना आहे. त्यामुळे लसीची प्रतीक्षा आहे.
यश अंतिम टप्प्यात
जगभरात लसनिर्मितीच्या युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत असून ही लस आता दृष्टिपथात आली आहे.