Corona Vaccine Booster Dose : कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज आहे का? ICMR प्रमुखांनी काय सांगितले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:45 PM2021-11-23T14:45:12+5:302021-11-23T14:46:53+5:30
Corona Vaccine Booster Dose: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाच्या (NTAGI) पुढील बैठकीत बूस्टर डोसवर चर्चा होऊ शकते.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गापासून लोकांना वाचवण्यासाठी सध्या कोरोना लसीच्या बूस्टर डोसच्या (Corona Vaccine Booster Dose) गरजेबाबत बरीच चर्चा होत आहे. दरम्यान, कोरोना लसीचा (Corona Vaccine) बूस्टर डोस किंवा तिसरा डोस देण्याच्या गरजेच्या समर्थनात आतापर्यंत कोणतेही वैज्ञानिक पुरावे आलेले नाहीत, असे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सोमवारी सांगितले. तसेच, सध्या वयस्क लोकांना लसीचा दुसरा डोस देणे हे सरकारचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाच्या (NTAGI) पुढील बैठकीत बूस्टर डोसवर चर्चा होऊ शकते. आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव यांनी एका या वृत्तसंस्थेला सांगितले की, संपूर्ण वयस्क लोकांना लसीचा दुसरा डोस देणे आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लसीकरण सुनिश्चित करणे हे सरकारचे सध्याचे प्राधान्य आहे. कोरोना विरोधात बूस्टर डोसची गरज असल्याचे समर्थन करण्यासाठी अद्याप कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
लसीचा बूस्टर डोस देण्याच्या शक्यतेवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच सांगितले होते की, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य आहे. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार बुस्टर डोसबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले होते. तसेच, सरकार अशा प्रकरणात थेट निर्णय घेऊ शकत नाही. ज्यावेळी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि तज्ज्ञांची टीम बूस्टर डोस देण्याबाबत सांगेल, त्यावेळी आम्ही त्यावर विचार करू, असेही मनसुख मांडविया यांनी म्हटले होते.
याचबरोबर, मनसुख मांडविया असेही म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच तज्ज्ञांच्या मतावर अवलंबून असतात, मग ते लस संशोधन असो, निर्मिती असो किंवा मान्यता असो. अधिकार्यांच्या मते, भारतातील पात्र लोकांपैकी जवळपास 82 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर सुमारे 43 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.