तब्बल ४५ दिवसांपासून झोप नाही; बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 09:41 AM2024-10-01T09:41:13+5:302024-10-01T09:41:38+5:30
सोमवारी सकाळी घरी तरुण हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना दुसऱ्या खोलीत बंद केले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी मेघा आणि मुले यथार्थ आणि पिहू असा परिवार आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील झाशी येथे बजाज फायनान्समध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीने कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या केली. तरुण सक्सेना असे त्यांचे नाव असून, त्यांनी एक चिठ्ठीही लिहिली आहे.
वरिष्ठ टार्गेट पूर्ण करण्यासाठी सतत दबाव आणत आहेत. टार्गेट पूर्ण न केल्यास पगार कापला जाईल, कामावरून काढले जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली होती. मी खूप तणावाखाली असल्याने ४५ दिवस झोपलो नाही, असे त्यांनी या चिठ्ठीत म्हटले आहे. बजाज फायनान्सने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली नाही.
सोमवारी सकाळी घरी तरुण हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना दुसऱ्या खोलीत बंद केले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी मेघा आणि मुले यथार्थ आणि पिहू असा परिवार आहे.
शक्य ते सर्व प्रयत्न करूनही टार्गेट गाठू न शकल्यामुळे मी प्रचंड तणावाखाली आहे, असे आपल्या पत्नीला उद्देशून लिहिलेल्या पाच पानांच्या पत्रात तरुणने म्हटले आहे.
तरुण यांना त्यांच्या क्षेत्रातून बजाज फायनान्सच्या कर्जाचे ईएमआय गोळा करण्याचे काम सोपवण्यात आले होते, परंतु ते टार्गेटमध्ये कमी पडत होते. वरिष्ठांनी माझा सतत अपमान केला. मी भविष्याबद्दल खूप तणावात आहे. विचार करण्याची क्षमता गमावली आहे. मी जगाचा निरोप घेत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मम्मी, पप्पा तुमच्याकडे काही मागतो आहे...
तुम्ही सर्व जण मेघा, यथार्थ आणि पिहूची काळजी घ्या. मम्मी, पापा, मी कधीच काही मागितले नाही; पण आता मागतो. कृपया दुसरा मजला बांधा, त्यामुळे कुटुंब आरामात राहू शकेल, असे लिहीत त्यांनी मुलांना चांगला अभ्यास करण्यास व आईची काळजी घेण्यास सांगितले आहे. त्यांनी आपल्या नातेवाइकांना विम्याचे पैसे मिळतील, याची खात्री करण्यास सांगितले आहे.