'संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी आयोजित केली जाऊ शकत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 05:48 PM2018-06-05T17:48:48+5:302018-06-05T17:48:48+5:30
राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या विनंतीवर संघाची प्रतिक्रिया
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्रातील विभागानं नागपूरमधील संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी आयोजित करण्याची मागणी केली होती. यावर आता राष्ट्रीय मुस्लिम मंचानं स्पष्टीकरण दिलं आहे. 'इस्लाम कोणालाही मुस्लिम व्यक्तींसाठी पार्टी आयोजित करण्यास सांगत नाही. त्यामुळेच राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्र विभागाच्या नेत्यानं केलेल्या विनंतीमध्येच त्रुटी आहे. तशी माहिती संबंधितांना देण्यात आली आहे,' असं मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अफझल यांनी एका इंग्रजी दैनिकाला सांगितलं.
राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्र विभागाचे संयोजक मोहम्मद फारुख शेख यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरचे महानगर संघचालक राजेश लोया यांना इफ्तार पार्टीच्या आयोजनासंबंधी विनंती केली होती. संघाच्या मुख्यालयातील स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्याची विनंती शेख यांनी केली होती. त्यावरुन मोठा वाद झाला होता. यानंतर शेख यांची विनंती संघाकडून अमान्य करण्यात आली. 'त्या परिसरात कोणतीही पार्टी आयोजित केली जाऊ शकत नाही,' असं उत्तर संघाकडून शेख यांना देण्यात आलं.
संघाकडून नकार आल्यानंतर मोहम्मद फारुख शेख यांनी नाराजी व्यक्त केली. संघानं इफ्तार पार्टी आयोजित केल्यास त्यामुळे जगभरात बंधूभावाचा संदेश जाईल, असं मला वाटलं होतं, असं शेख म्हणाले. 'भारतात असहिष्णूता आहे, अशी चर्चा जगात आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा पार्टीचं आयोजन करण्यात गैर काय?,' असा सवाल शेख यांनी उपस्थित केला. 'गेल्या वर्षी आम्ही मोमिनपुरातील जामा मशिदीसमोर इफ्तार पार्टी आयोजित केली. त्या पार्टीत संघ आणि भाजपाचे नेते सहभागी झाले होते,' असंही शेख यांनी सांगितलं. यावर भाष्य करताना, स्मृती मंदिर परिसरात असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकत नाही, असं संघातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितलं. सध्या स्मृती मंदिर परिसरात प्रशिक्षण सुरू आहे, असंही या अधिकाऱ्यानं म्हटलं.