येचुरींना राज्यसभेचे दरवाजे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 02:48 PM2017-07-26T14:48:37+5:302017-07-26T14:50:37+5:30

No third Rajya Sabha term for Yechury | येचुरींना राज्यसभेचे दरवाजे बंद

येचुरींना राज्यसभेचे दरवाजे बंद

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26- राज्यसभेतील फायरब्रॅंड खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताराम येचुरी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तिसरी टर्म देण्यास नकार दिला आहे. पक्षाच्या मध्यवर्ती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. येचुरी यांना पुन्हा राज्यसभेत पाठवायचे की नाही यावरुन समितीमध्ये दोन गट पडल्याने अखेर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यानंतर येचुरींचा राज्यसभा प्रवेश रोखला गेल्याचे स्पष्ट झाले.

मार्क्सवादी पक्षाच्या नियमांनुसार कोणत्याही नेत्याला राज्यसभेच्या दोनपेक्षा अधिक टर्म देण्यात येत नाहीत. त्याचप्रमाणे पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पद भूषविणाऱ्या नेत्याला कॉंग्रेसच्या मदतीने राज्यसभेत पाठवणे पक्षाच्या केरळ गटाला मान्य नव्हते. मध्यवर्ती समितीमधील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या दक्षिणेच्या राज्यांमधील सदस्यांनीही येचुरींना तिसरी टर्म देण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.

    पक्षाच्या पश्चिम बंगाल येथील सदस्यांनी येचुरींचा प्रस्ताव जून महिन्यातच पॉलिट ब्यूरोसमोर सादर केला होता. मंगळवारी मध्यवर्ती समितीसमोर चर्चेसाठी येण्यापुर्वीच तो प्रस्ताव पॉलिट ब्युरोने नाकारला होता. केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख विरोधक असणाऱ्या कॉंग्रेसच्या मदतीने येचुरी यांना राज्यसभेत पाठवणे कदापिही शक्य होणार नाही असे मत केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले होते. त्यानंतर विजयन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी केला. मात्र तो निष्फळ ठरला. या घडामोडींमुळे पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा विरुद्ध दक्षिणेतील राज्ये असे दोन गट मध्यवर्ती समितीमध्ये पडले.

राज्यसभेत विरोधकांची बाजू कमकुवत
राज्यसभेत सत्ताधारी रालोआला प्रत्येक मुद्द्यावर धारेवर धरण्यासाठी येचुरी प्रसिद्ध आहेत. सीताराम येचुरी, डी. राजा, नरेश अग्रवाल, आनंद शर्मा, सतीश मिश्रा, मायावती आणि शरद यादव या विविध पक्षांच्या सदस्यांनी विरोधकांची बाजू आजवर जोमाने मांडून विविध मुद्दयांवर बाजू स्पष्ट करायला लावली होती. त्यापैकी मायावती यांनी याच आठवड्यात राजीनामा दिला. आता येचुरी यांनाही राज्यसभेचे दरवाजे बंद झाल्यानंतर विरोधकांची बाजू कमकुवत होण्याची शक्यता आहे.

Web Title: No third Rajya Sabha term for Yechury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.