सुशांतच्या शरीरात विषाचे अंश आढळले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 07:14 AM2020-09-30T07:14:18+5:302020-09-30T07:14:53+5:30
‘एम्स’कडून अहवाल सादर; पोस्टमार्टममध्ये त्रुटी
मुंबई : दीड महिन्याच्या तपासात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत ठोस कारणांचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या सीबीआयला मंगळवारी आणखी एक धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूवेळी त्याच्या शरीरात विषाचे अंश सापडले नसल्याचे त्याच्या व्हिसेरा अहवालातून स्पष्ट झाले.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) वैद्यकीय मंडळाने फेरतपासणीचा अहवाल दिल्लीत सीबीआय अधिकाऱ्यांना मंगळवारी सादर केला. शवविच्छेदनावेळी कूपर रुग्णालयाने पुरेशी खबरदारी न घेतल्याचे त्यात नमूद केल्याचे समजते. सुशांत १४ जूनला वांद्रे येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. याला अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचे कुटुंब कारणीभूत असल्याची तक्रार सुशांतच्या कुटुंबीयांनी केली होती. त्याबाबत पटना येथे दाखल गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांकडील गुन्हाही त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते. एम्सच्या अहवालामुळे सीबीआयला आता सुशांतने आत्महत्याच केली होती, हे गृहित धरून त्यास कोण कारणीभूत आहे, याअनुषंगानेच तपास करावा लागेल.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या
एम्सच्या अहवालावरून मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू होता, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केवळ बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन एका राजकीय पक्षाकडून मुंबई पोलीस आणि महाराष्टÑाची बदनामी सुरू आहे.
- अनिल देशमुख, गृहमंत्री
रियाच्या जामिनाला एनसीबीचा विरोध
ड्रग्जप्रकरणी आरोपी असलेले रिया व शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जाला एनसीबीने उच्च न्यायालयात विरोध केला. सुशांत व ड्रग्ज तपासाचा काहीही संबंध नाही. हा तपास ड्रग्ससंबंधीत संघटित गुन्ह्यांविषयी आहे, असे एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाला सांगितले. रिया व शोविकने केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे.