युद्ध नको, बुद्ध हवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:52 AM2019-03-03T02:52:42+5:302019-03-03T02:52:49+5:30
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देऊन पाकिस्तान काश्मीरसह भारतात घातपाती कारवाया घडवून आणतो. त्यामुळे एकदाच काय ते होऊन जाऊ दे...आता वेळच आली आहे तर युद्ध करून एक घाव दोन तुकडे करा, अशा प्रतिक्रिया बहुतांश वाचकांच्या आहेत. तसेच ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, अशी भावना व्यक्त करून शांततेच्या मार्गानेच भारताने जावे, असे वाटणाऱ्या वाचकांची संख्याही लक्षणीय आहे. सध्याच्या अणुयुगातील युद्धाची भीषणता काय असू शकते, याचा अंदाज बांधता येणाऱ्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून विचार करा, असे सुनावले आहे. दहशतवादाचा राक्षस गाडायलाच पाहिजे, त्यासाठी गाफील न राहता शांतीवार्ता करीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करा. जगभरातील अनेक देश भारताच्या पाठीशी उभे राहतील. जगात भारताची मान उंचावेल, याची खात्रीही वाचकांना वाटते.
।चर्चा हाच रामबाण उपाय
भारत-पाकिस्तान संघर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याने युद्धाची भाषा योग्य नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकून दहशतवादाचा नायनाट करणे, हाच रामबाण उपाय आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोसणारा देश असल्याने त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता येत नाही. तरीही युद्धापेक्षा चर्चाच योग्य उपाय आहे.
- प्रा. उमेश रणदिवे, मेघराज नगर, लातूर
>विषाची परीक्षा नको
पृथ्वीराज चौहान याने महम्मद घोरीला १७ वेळा हरवूनही सोडून दिले. त्याचा परिणाम आपण विसरू शकणार नाही. मग पुन्हा विषाची परीक्षा कशासाठी? जोपर्यंत दहशतवादी पूर्णपणे शरणागती स्वीकारत नाहीत तोपर्यंत पाकबरोबर कोणत्याही कारवाईत ढिलेपणा दाखवू नये.
- मोहन नातू , अहमदनगर.
> अटी घालून शांतीवार्ता करा
छुपे हल्ले बंद करावे, भारताविरुद्ध कारवाया करणाºया दहशतवादी संघटनांवर बंदी आणावी, आदीं अटी ठेवूनच शांतीवार्ता करावी. भारताने शहीद ४० जवानांचा बदला घेताना १३ दिवसांत ३५० दहशतवादी ठार केले. भारताची ताकद पाकिस्तानच्या लक्षात आली असेलच. आता इतर देशही नक्कीच भारताला पाठिंबा देतील.
- युगराजभाऊ गिहेर्पुंज, बालाजी नगर, खातरोड, भंडारा.
>उखडून टाका...
युध्द व भांडण हे कोणालाही परवडणारे नसते, परंतु असे काही प्रसंग असतात की त्याला मुळापासून उखडून टाकणे गरजेचे असते. एखाद्या दानवाला राजाश्रय भेटला तर दानवाला संपवण्यासाठी राजाला संपवणे गरजेचे असते, तशीच परीस्थिती आज पाकिस्तानची आहे. त्यांनी दहशतवाद संपविण्याची हमी देत दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन केले तर शांती वार्ता शक्य आहे.
- रमेश देहेडकर,
देहेडकरवाडी जालना.
>हिसका दाखवाच
अगोदर उंदराने मांजरीला घाबरावयाचा प्रयत्न करायचा आणि नंतर मांजरीने डोळे वटारले की मांजरीचे पाय चाटायचे, हेच आतापर्यंत पाकिस्तानच्या बाबतीत घडत आलेलं आहे. युद्ध दोन्ही देशांना परवडणार नाही. तेव्हा पाकिस्तान सोबत शांती वार्ता करा पण अगोदर त्यांना आपला हिसका दाखवा, म्हणजे ते वठणीवर येतील.
- संजय मारोतराव मुसळे, छत्रपती नगर, हिंगोली.
>शांतता हवी...
युद्ध व शांती यापैकी ‘शांती’ हा जगातल्या सर्व धर्मग्रंथांमधील समान असा शब्द असून मानवी जीवनासह सर्व चराचर सृष्टीचे तेच अंतीम ध्येय असावे. भारत हा आपला देश शांतताप्रिय आहे. युद्धाची विषारी फळे चाखायला कुणाला बरे आवडेल? पाकिस्तानने शांतीच्या मार्गावर एक तरी पाऊल पुढे टाकावे.
- व्ही. पी. जोशी (उपशिक्षक), न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर-जळगाव.
>दहशतवाद संपवा
भारत-पाकिस्तान युद्ध होणे गरजेचे नाही तर हा दहशतवाद संपणे गरजेचे आहे. जर युद्ध सुरू केले तर दोन्हीकडचे शेकडो जवान शहीद होतील, कुटुंबे उद्ध्वस्त होतील, हजारो कोटींची वित्तहानी होईल. सीमेवरील कितीतरी लोकांना गाव सोडून जावे लागेल. यापेक्षा दोन्ही देशांनी मिळून दहशतवाद संपवावा.
- विजय बाळासो शिंदे,
अंबप, कोल्हापूर.
>औकातच नाही
सध्याच्या परिस्थितीत युद्ध करण्याची काही गरज नाही. पीओकेमध्ये केलेल्या कारवाईने भारत काय आहे आणि काय करू शकतो, हे दाखवून दिल्यानंतर पाकिस्तान खूप भेदरला आहे. त्यातूनच पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची वार्ता सुरू केली आहे. प्रत्यक्ष युद्ध करायची पाकिस्तानची औकात नाही. मेलेल्या सापाला धोपटण्यात सध्या काही अर्थ नाही.
- अनिल बबन सोनार, उपळाई बुद्रुक, माढा, जि. सोलापूर.
>...हे तर मगरीचे अश्रू
पाकिस्तान हा मुळातच खोटारडा देश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची शांततेची भाषा हे मगरीचे अश्रू आहेत. अमेरिकन सैन्याने पाकिस्तानात घुसून जसा ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, तशाच प्रकारे जैश-ए-मोहम्मद व इतर दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करून नराधमांना मित्र राष्ट्रांच्या सहकार्याने यमसदनी पाठवावे.
- सुनील कन्नोर, निमशेवडी, ता. मालेगाव, जि. नाशिक
>शांततेचा मार्ग, पण कठोरपणे
पाकिस्तानने जी खोडी काढली त्याचे जबरदस्त उत्तर त्यांना मिळाले. युद्ध हा अंतिम पर्याय आहे. युद्धानंतर मात्र काहीच शिल्लक राहत नाही, उरतात त्या फक्त वेदनाच. पाकिस्तानच्या संस्कृतीप्रमाणे भारतानं विचार केला तर तो पाकिस्तानचा विजय असेल. कारण दहशतवाद्यांना हेच तर हवे आहे. त्यामुळे शांततेचा मार्ग अवलंबवायचा पण कठोरपणे!
- डॉ. विनय वसंतराव दांदळे, वसंतकुंज , गोकुळ कॉलनी, अकोला.
पाकिस्तानची स्थिती धृतराष्ट्रासारखी
महाभारतामध्ये श्रीकृष्णाने शांतिदूत म्हणून शांतीवार्ता केली. पण दुर्योधनाला त्यावर विश्वास नव्हता. तशाच प्रकारे पाकिस्तानलाही शांतीसंदेश समजत नाही. जेव्हा भीमाने शंभर कौरव मारण्यास सुरुवात केली, तेव्हा धृतराष्ट्र म्हणतो की, युद्ध थांबावं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तशी परिस्थिती आज पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तान दहशतवादी संघटनांना साथ देण्याचे सोडत नाही तोपर्यंत भारत युद्धवार्ताच करेल.
- गोविंद गिरी, अंबानेर, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
>पाकिस्ताननेही पुढे यावे
आजच्या परिस्थितीत युद्ध हा पर्याय मुळीच नाही. पाकिस्तान भारतावर आक्रमण करेल असे वाटत नाही. कारण त्यांनी जर तसे केले तर ते दहशतवादी राष्ट्र घोषित होऊन अमेरिका आदी बलाढ्य राष्ट्र त्याच्यावर निर्बंध घालू शकतात. त्यामुळे आधीच मोडकळीस आलेली त्यांची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट अवस्थेला जाईल. दहशतवादी संघटनांना नष्ट करण्यास पाकिस्तान जर असमर्थ असेल तर तसे त्यांनी जाहीर करावे व भारताची मदत घ्यावी. तरच खऱ्या अर्थाने शांतीवार्ता सफल होईल असे वाटते.
- दिलीप जुगादे,
१०७ पावनभूमी, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर
>पाकिस्तानकडून शांततेचा प्रस्ताव म्हणजे कुटनीतीच!
पाकिस्तानातील राजनैतिक धोरण लष्कराच्या अधिपत्त्याखाली आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांचा शांततेचा प्रस्ताव म्हणजे कुटनीती असल्याचे जाणवते. आजवरच्या युद्धाचा इतिहास पाहता, याच शांततेच्या नावाखाली युद्धे झाली. त्यावेळी असाच विश्वास ठेवून मोठी चूक केली होती. ती परत होऊ देऊ नये. इम्रान खान यांच्याकडून शांततेचा जसा प्रस्ताव आला, तसाच दहशतवाद संपविण्यासाठी जोपर्यंत ठोस प्रस्ताव येऊन कार्यवाही होत नाही तोपर्यंत शांततेची चर्चा करू नये.
- शिवशंकर वानोळे, बोधडी बु, किनवट, जि. नांदेड.