पीओकेतील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून बंद?; लष्करप्रमुख म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 05:05 PM2019-06-10T17:05:53+5:302019-06-10T17:07:55+5:30
पीओकेतील दहशतवादी तळ बंद केल्याचा पाकिस्तानचा दावा
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकनंतर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत असल्याचं पाकिस्तानकडून जगाला सांगितलं जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कॅम्प बंद केले जात असल्याचा दावा शेजारी देशाकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या दाव्याबद्दल लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी शंका व्यक्त केली. पाकिस्तानकडून खरंच दहशतवाद्यांचे तळ बंद केले जात आहेत का, हे तपासून पाहणं अवघड आहे. त्यामुळे भारताकडून केली जाणारी सीमांवरील निगराणी सुरुच राहील, असं रावत म्हणाले.
Army Chief General Bipin Rawat on reports about Islamabad shutting down terror camps in Pakistan occupied Kashmir (PoK): No way to verify whether Pakistan has closed down terrorist camps or not. We will continue to maintain strict vigil along our borders. (File pic) pic.twitter.com/cbUC8Tzhrl
— ANI (@ANI) June 10, 2019
पाकिस्तानकडून केला जाणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं रावत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं. आपल्या देशाची जमीन दहशतवादी कृत्यांसाठी वापरली जात नाही, देशातून दहशतवादी कारवाया केल्या जात नाहीत, असे दावे पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आले आहेत. यानंतर आता पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद केले जात असल्याचा दावा केला आहे. भारत आणि अमेरिकेकडून दबाव आल्यानंतर पाकिस्ताननं अनेकदा असे दावे केले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान सरकारच्या किंवा पाकिस्तानी लष्कराच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवता येणार नसल्याचं रावत अप्रत्यक्षपणे म्हणाले.
पाकिस्तानकडून दहशतवादी तळ बंद केले जात आहेत की नाही, याची पडताळणी करुन पाहता येणं अतिशय अवघड असल्याचंदेखील रावत यांनी म्हटलं. 'पाकिस्तानात एक-दोन दहशतवादी तळ नाहीत. पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी अनेक तळ उभारले आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर त्यांना कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये पाठवण्यात येतं,' असंदेखील लष्कर प्रमुखांनी सांगितलं.