लग्नानंतर "नो कुश्ती", सेहवागच्या साक्षीला हटके शुभेच्छा
By admin | Published: April 3, 2017 11:07 AM2017-04-03T11:07:55+5:302017-04-03T11:08:45+5:30
विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाच्या शुभेच्छा देताना मिश्किल अंदाजात साक्षीला आता कुस्ती न करण्याचा सल्ला देऊन टाकला
Next
ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. 3 - रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक विवाहबंधनात अडकली आहे. २ एप्रिल रोजी साक्षीचा विवाहसोहळा पार पडला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियानसोबत साक्षी विवाहबंधनात अडकली आहे. रोहतकजवळील नांदल गावात साक्षी मलिकचा विवाहसोहळा पार पडला. साक्षी मलिकने पारंपारिक वधूप्रमाणे पेहराव केला होता. या क्षणी तिचे चाहते तसंच अनेक स्टार्सनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
साक्षी मलिकला शुभेच्छा देणा-यांमध्ये भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागदेखील होता. आता विरेंद्र सेहवाग शुभेच्छा देणार म्हणजे सरळ शब्दांमध्ये देणार नाही एवढं नक्की. विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाच्या शुभेच्छा देताना मिश्किल अंदाजात साक्षीला आता कुस्ती न करण्याचा सल्लाही देऊन टाकला. "साक्षी तुला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. आयपीएल कॅम्पमुळे तुझ्या लग्नात सहभागी नाही होऊ शकलो. आनंददायी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि हो आता घरात कुस्ती नको", असं ट्विट विरेंद्र सेहवागने केलं आहे.
Wish you a very happy married life @SakshiMalik . Couldn"t make it because of IPL camp. Best wishes for a life of joy and no kushti at home
— Virender Sehwag (@virendersehwag) April 2, 2017
साक्षीचा पती सत्यव्रतदेखील तिच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे. 2016 मध्ये पदकविजेता ठरलेल्या साक्षी मलिकचा गतवर्षी सत्यव्रतसोबत साखरपुडा पार पडला होता. सत्यव्रत 2014 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकलं आहे.
साक्षीचं लग्न संस्मरणीय करण्यासाठी स्वत: साक्षी आणि कुटुंबियांना काहीच कसर सोडली नाही. साक्षीची आई सुदेश आणि वडील सुखबीर मलिक यांनी आपल्या लाडक्या लेकीचं लग्न अगदी खास पद्धतीने करण्यासाठी याची जबाबदारी रोहतकमधील एका वेडिंग व इव्हेंट प्लानरवर सोपवली होती.
या हायप्रोफाईल विवाहसोहळ्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासहीत क्रीडाक्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नसोहळ्यासाठी जवळपास १२ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.