चुकीला माफी नाही... जावेद हबीबविरुद्ध महिला पूजा गुप्ता आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 05:10 PM2022-01-07T17:10:55+5:302022-01-07T17:12:16+5:30
जावेद हबीबने केसात थुंकल्याचा आरोप ब्युटी पार्लरच्या महिलेने केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यानं माफी मागितली आहे.
नवी दिल्ली - Jawed Habib Viral Video: प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो एका महिलेचे केस कापताना (Hair Cutting) दिसत आहे. पण, हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबचे केस कापताना केलेले विचित्र कृत्य. जावेदने या कृत्याबद्दल समाजमाध्यमावर माफीही मागितली आहे. मात्र, पीडित महिलेनं न्यायालयीन लढाई लढणार असल्याची भूमिका स्पष्ट केलीय.
जावेद हबीबने केसात थुंकल्याचा आरोप ब्युटी पार्लरच्या महिलेने केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यानं माफी मागितली आहे. जावेद हबीबनं इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर करत मनापासून माफी मागत असल्याचं म्हटलं. मात्र, पीडित महिलेनं चुकीला माफी नाही, अशीच भूमिका घेतली आहे.
हबीब यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी माफी मागितल्यानंतरही पुजा गुप्ता यांनी संताप व्यक्त केला आहे. ब्युटी पार्लरच्या चालक पुजा गुप्ता यांनी जावेद हबीबची माफी ही फिल्मीस्टाईल नाटक आहे. त्यांची माफी मान्य नसून त्यांचे वर्तन कधीही स्विकार्ह नाही, असे पुजा यांनी म्हटले आहे. जावेद हबीब माफी मागण्याचं नाटक करत आहेत. मात्र, मी त्यांच्याविरुद्ध लढाई लढणार, त्यांना शिक्षा देणारच, अशी आक्रमक भूमिका पुजा गुप्ता यांनी घेतली आहे.
दरम्यान, जावेद हबीबनं माफी मागताना थुंकण्याबद्दल वक्तव्य टाळलं, तसंच आपल्या काही शब्दांमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यावर आपण माफी मागतो असं म्हटलं. "आमच्या सेमिनारमध्ये काही शब्दांमुळे लोकं दुखावली गेली आहेत. आमचे जे सेमिनार असतात ते प्रोफेशनल असतात हे मी सांगू इच्छितो. म्हणजेच आम्ही जे काम करतो त्याचा यात समावेश असतो, अनेकदा त्यांचा कालावधीही मोठा असतो. यासाठीच आम्हाला ह्युमरस बनावं लागतं. परंतु जर कोणी दुखावलं गेलं असेल तर माफ करावं," असं तो व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय.
काय आहे प्रकरण ?
व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की जावेद हबीब केस कापताना पाण्याऐवजी केसात थुंकला. रिशी बग्री नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबवर जोरदार टीका करण्यात आली होती. तर, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेची प्रतिक्रियाही समोर आली होती.
काय म्हणाली महिला?
"माझे नाव पूजा गुप्ता आहे. माझे बरौत शहरात वंशिका ब्युटी पार्लर नावाचे पार्लर आहे. काल मी जावेद हबीब सरांच्या सेमिनारला गेले होते. तिथे त्यांनी मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले. यावेळी त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. पाणी नसेल तर थुंकूनही केस कापता येतात, असं दाखवून दिलं. मी तो हेअरकट केला नाही, यापुढे मी रस्त्यावर केस कापून घेईन पण, जावेद हबीबकडून नाही," असं ती महिला शेअर केलेल्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.