कैलाश सत्यर्थी व मलाला युसुफजाईला शांततेचं नोबेल

By Admin | Published: October 10, 2014 02:51 PM2014-10-10T14:51:14+5:302014-10-10T15:18:09+5:30

कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला व महिला शिक्षणासाठी जीव झोकणा-या मलाला युसुफजाईला संयु्क्त शांतता नोबेलने गौरवण्यात आले आहे.

Nobel Peace Prize to Kailash Satyarthi and Malala Yusufzai | कैलाश सत्यर्थी व मलाला युसुफजाईला शांततेचं नोबेल

कैलाश सत्यर्थी व मलाला युसुफजाईला शांततेचं नोबेल

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
स्टॉकहोम (नॉर्वे), दि. १० - कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून मलाला युसुफजाईलाही नोबेलने गौरवण्यात आले आहे. सत्यर्थी व मलाला यांना शांततेचे नोबेल संयुक्तपणे देताना नोबेल समितीने आवर्जून असे म्हटले आहे की, हिंदू व मुस्लीम तसेच भारतीय व पाकिस्तानी, अज्ञान व कट्टरतावाद यांच्याविरोधात एकत्र झटत असल्याची दखल हा पुरस्कार या दोघांना देताना घेतली आहे.  बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते असलेल्या सत्यर्थींना व मलालाला २७८ उमेदवारांमधून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. सत्यर्थी यांनी बालमजुरीविरोधात गेली काही दशकं केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. मध्यप्रदेशातील विदीषा येथे १९५४ साली जन्म घेतलेले कैलाश सत्यर्थी हे नोबेल पारितोषिक मिळवणारे आठवे भारतीय ठरले आहेत.
भारतीयाला शांततेच्या नोबेल पुरस्कारानं गौरवलं जाण्याची घटना तब्बल ३५ वर्षांनंतर घडली असल्यामुळे देशभरात आनंद साजरा केला जात आहे. तर जीवाची बाजी लावून मुलींच्या शिक्षणासाठी साक्षात तालिबानशी दोन हात करणा-या मलालाला नोबेलनं गौरवल्यामुळेही आनंद व्यक्त होत आहे. याआधी २००९मध्ये रसायनशास्त्रातल्या संशोधनाबद्दल डॉ. वेंकटरामण रामकृष्णन यांना नोबेल मिळाले होते, तर तब्बल ३५ वर्षांपूर्वी मदर तेरेसांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांना मजुरी करायला लावणा-या नृशंस घटना भारतात घडत आल्या आहेत. या अमानवी प्रकाराविरोधात सत्यर्थींनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानं प्रखर विरोध केला आणि बालमजुरीसारख्या मुलांचं जीवन उद्धवस्त करणा-या प्रथेविरोधातला लढा तीव्र केला. या पुरस्कारामुळे अत्यंत आनंद झाला असून बालमजुरीसारख्या अनिष्ट पद्धती हद्दपार होतील, त्याविरोधात लढणा-या कार्यकर्त्यांना बळ मिळेल तसेच लहान मुलांचे जीवन सुधारेल अशी अपेक्षा सत्यर्थी यांनी व्यक्त केली आहे.
बालहक्कांच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही सहभाग घेऊन सत्यर्थी यांनी हा प्रश्न जागतिक पातळीवर चर्चेत ठेवण्याचे तसेच बालहक्कांसाठी जागतिक सहमती तयार करण्याचे व यासंदर्भात जागतिक पातळीवर कायदे तयार करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केले आहेत. सत्यर्थी यांना मिळालेल्या या पुरस्कारांमुळे भारतासह जगातल्या बालमजुरीला व लहान मुलांना मिळणा-या अमानवी वागणुकीला आळा बसण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना होईल अशी आशा आहे.
तर, मलाला युसुफजाईला मिळालेल्या या नोबेल पुरस्कारामुळे महिला शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येईल आणि तालिबानसारख्या दहशतवादी वृत्तींविरोधात लढणा-यांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
यापूर्वी नोबेल पुरस्काराने गौरवलेले भारतीय
 
रवींद्रनाथ टागोर (साहित्य) - १९१३
सर सी. व्ही. रमण (रमण ईफेक्ट, भौतिकशास्त्र) - १९३०
डॉ. हरगोविंद खुराणा (वैद्यकशास्त्र) - १९६८
मदर तेरेसा (शांततेसाठी) - १९७९
डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर (भौतिकशास्त्र) - १९८३
डॉ. अमर्त्य सेन (अर्थशास्त्र) - १९९८
डॉ. वेंकटरमण रामकृष्णन (रसायनशास्त्र) - २००९

Web Title: Nobel Peace Prize to Kailash Satyarthi and Malala Yusufzai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.