सत्यार्थींच्या नोबेलची प्रतिकृती अखेर सापडली
By admin | Published: February 13, 2017 12:30 AM2017-02-13T00:30:29+5:302017-02-13T00:30:29+5:30
कैलास सत्यार्थी यांच्या चोरीला गेलेल्या नोबेल सन्मानाची प्रतिकृती पोलिसांना सापडली असून या प्रकरणी तीन जणांना अटक झाली आहे.
नवी दिल्ली : कैलास सत्यार्थी यांच्या चोरीला गेलेल्या नोबेल सन्मानाची प्रतिकृती पोलिसांना सापडली असून या प्रकरणी तीन जणांना अटक झाली आहे. दक्षिणपूर्व दिल्लीतील सत्यार्थी यांच्या घरातून सात फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास नोबेलची प्रतिकृती व इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. नोबेलच्या प्रतिकृतीसोबत चोरी झालेले मानपत्र मात्र हाती लागलेले नाही.
राजन उर्फ नत्ता (२५), विनोद (३५) आणि सुनील (२८) यांना भावांना अटक झाली असून त्यांचा यापूर्वीही घरफोडी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांत सहभाग होता. अतिशय तातडीने वस्तू परत मिळवल्याबद्दल सत्यार्थी यांनी दिल्ली पोलिसांचे आभार मानले आहेत. गुन्ह्याचा पारंपरिक पद्धतीने शोध घेण्याची पद्धत यात उपयोगी पडली, असे सह पोलिस आयुक्त (दक्षिणपूर्व) आर. पी. उपाध्याय यांनी सांगितले. सत्यार्थी यांचे नोबेल पदकाची प्रतिकृती आमच्यासाठी खूप महत्वाची घटना होती, असेही ते म्हणाले.