भारतावर प्रेम करण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही, सोनिया गांधींचं मोदींना प्रत्युत्तर
By admin | Published: May 9, 2016 10:45 PM2016-05-09T22:45:41+5:302016-05-09T23:21:54+5:30
भारत माझं घर आहे, मी माझा शेवटचा श्वास भारतातच घेईन, असं म्हणत विरोधकांना सोनिया गांधींनी उत्तर दिलं
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटालियन संबंधांवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष्य केलं होतं.याबाबत सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारत माझं घर आहे, मी माझा शेवटचा श्वास भारतातच घेईन, असं म्हणत विरोधकांना सोनिया गांधींनी उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या इमानदारीवर सारखे हल्ले करत आहेत. मात्र तुम्ही माझी देशाप्रति असलेली बांधिलकी आणि प्रेमाला आव्हान देऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींना माझ्या भावना कळतील, अशी माझी अपेक्षाच नाही. मात्र देशातील जनता मला समजून घेईल आणि माझ्यावर विश्वास ठेवेल, असं वक्तव्य सोनिया गांधींनी केरळमध्ये केलं आहे. मोदींनी केलेल्या इटली संबंधांच्या टीकेला उत्तर देताना मी इटलीमध्ये जन्मली होती. मी 1968ला इंदिरा गांधींच्या सुनेच्या रूपात भारतात आल्याची माहिती सोनिया गांधींनी दिली आहे. सोनिया गांधींनी यावेळी भाजप आणि संघानं माझा अपमान केल्याचंही म्हटलं आहे. गेल्या 48 वर्षांपासून आरएसएस, भाजपा आणि इतर पक्ष मी इटलीमध्ये जन्म घेतल्यामुळे मला टोमणे मारतात, मात्र मी इटलीतल्या एका सुसंस्कृत आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला आणि त्याची मला लाज वाटत नाही, हो माझा इटलीशी संबंध आहे, असंही म्हणत सोनिया गांधींनी विरोधकांना ठणकावलं आहे.