बायकोनं कळवलं 'मुलगा गेला'... 'तो' पार कोसळला, चालतच निघाला, धाय मोकलून रडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 01:36 PM2020-05-16T13:36:59+5:302020-05-16T18:37:23+5:30
केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानतर तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.
नवी दिल्ली - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशल श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गतही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, अद्यापही लाखो मजूर पायपीट करत गावी जात आहेत. बिहारच्या नवादा येथील रहिवाशी राम पुकार पंडित यांचा एका फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानतर तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध राज्यातील मजूर राज्यातील विविध भागात अडकलेले होते. आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मजूर गावी जाताना दिसत आहेत. देशातील विविध रेल्वे स्थानकांवरुन काही ट्रेनही परराज्यात रवाना झाल्या आहेत. तर, काही मजूर बसमधून रवाना होत आहेत. मात्र, अद्यापही मजूर, कामगार वर्गाचे अतोनात हाल सुरुच आहेत. कुणी शकडो मैल पायपीट करत आहे, कुणी अव्वाच्या सव्वा भाडं देऊन जनावरांसारखा ट्रक, टेम्पोनं प्रवास करतान दिसत आहे.
दिल्लीत काम करणाऱ्या राम पुकार यांना त्यांच्या पत्नीने त्यांच्या १ वर्षीय मुलाच्या मृत्युची बातमी दिली अन् बसल्याजागी तो पिता आतून कोसळला. आपल्या चिमुकल्याच्या निधनाची बातमी ऐकताच धाय मोकलून तो रडू लागला. गावी जाण्यासाठी कुठलंही वाहन न मिळाल्याने राम पुकार यांनी आपल्या लाडक्याला शेवटचं पाहण्यासाठी बिहारच्या दिशेनं पायीच प्रवास सुरु केला. मात्र, गाझियाबादच्या पुढं त्यांना जाताच आलं नाही. कारण, लाख विनंती केल्यानंतरही पोलिसांनी राम यांना पुढं जाऊच दिलं नाही. राम यांचा मोबाईलवर बोलतानाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दिल्लीतून निघाल्यानंतर युपी पोलिसांनी युपी गेटजवळच त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे, पुढील तीन दिवस गाजीपूर फ्लायओव्हरखालीच पुढील तीन दिवस राम पुकार यांना रहावे लागले. तब्बल तीन दिवस तिथं काढल्यानंतर, काही अधिकाऱ्यांनी राम यांना दिल्ली रेल्वे स्थानकावर नेऊन सोडले. जेथून ते श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून बिहारमधील बेगुसराय येथे पोहोचले आहेत. मात्र, अद्यापही आपल्या कुटुंबाला भेटण्याचा योग राम यांना आला नाह. ते एका शाळेत क्वारंटाईन झाले आहेत. तर, दुसरीकडे राम यांच्या मुलावर वडिलांशिवाय अंत्यसंस्कार पार पडले. आता, तीन मुली आणि बायको चिंतेत असल्याचं राम यांनी म्हटलंय.