कोणालाही देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही - शाहरूखचा आमिरला पाठिंबा
By Admin | Published: December 1, 2015 01:30 PM2015-12-01T13:30:38+5:302015-12-02T09:02:48+5:30
देशातील कोणत्याही नागरिकाला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही, असे सांगत शाहरुख खानने आमिर खानला पाठिंबा दर्शवला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - देशातील कोणत्याही नागरिकाला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. देशाबद्दल चांगला विचार करून देशाच्या भल्यासाठी काम केलं, तर त्यात सगळं आलं, असं सांगत अभिनेता शाहरुख खान सहअभिनेता आमिर खानच्या मदतीला धावून आला आहे. असहिष्णू वातावरणामुळे देश सोडून जाण्याबाबत पत्नीने विचारण केल्याचे आमिरने गेल्या आठवड्यात म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला होता, अनेकांनी त्याच्यावर टीका करत त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही आमिरच्या वक्तव्यावर नाराजी नोंदवत त्याच्यावर टीका केली होती. इतके दिवस या विषावर मौन बाळगणा-या शाहरूखने एका वृत्तवाहिनीशी बोलताना अखेर या मुद्यावर भाष्य करत आमिरला पाठिंबा दिला आहे.
देशातील कोणत्याही नागरिकाला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. प्रत्येकाने देशाच्या भल्यासाठीच काम केले पाहिजे. मी माझे काम पूर्ण जबाबदारी व निष्ठेने करत असेनत तर मला देशासाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही. माझ्या कामातूनच देशाला फायदा होईल. पण जर मी भ्रष्टपणे वागलो तर त्यामुळे माझ्या देशाची प्रतिमा मलिन होणार आहे, असे शाहरुख म्हणाला.