2019मध्ये नरेंद्र मोदींचा कोणीच करू शकणार नाही मुकाबला- नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 06:43 PM2017-07-31T18:43:07+5:302017-07-31T18:44:00+5:30
बिहारमध्ये भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता नितीश कुमार हे भाजपाच्या बाजूनं बोलू लागले आहेत.
पाटणा, दि. 31 - बिहारमध्ये भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता नितीश कुमार हे भाजपाच्या बाजूनं बोलू लागले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही, असं नितीश कुमार म्हणाले आहेत. बिहारमध्ये एनडीएसोबत संसार थाटल्यानंतर नितीश कुमारांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींशिवाय देशाला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदींशी सामना करण्याची क्षमता कोणातच नाही, 2019मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील. 2019मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नितीश कुमारांनी हे उत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, 2019मध्ये दिल्लीची सत्ता कोणी दुसरं काबिज करू शकत नाही. यावेळी नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी कोणाशीही तडजोड करू शकत नाही. तेजस्वी यादवला फक्त सीबीआय छाप्यांवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं होतं. मात्र ते त्यासाठी तयार नव्हते. कारण त्यांच्याजवळ बोलण्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे मला महागठबंधन ठेवणं कठीण झालं होतं. नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका केली आहे. काही जण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पैसा कमावता आहेत. हे मी कसं सहन करू शकतो. माझ्याजवळ दोनच मार्ग होते, एक तर भ्रष्टाचाराशी तडजोड करावी अन्यथा लोकांच्या टीकेचं धनी व्हावं. मी कोणत्याही टीकेला घाबरत नाही. त्यांच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे चादर ओढून पैसा कमावणं आहे. नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकला समर्थन दिल्यानंतरही माझ्यावर अनेकांनी टीका केली. मात्र मी सुरुवातीपासूनच यासोबत होतो.
80 टक्के लोकांकडे 1000 ते 500च्या जुन्या नोटा होत्या. बेनामी संपत्तीवर कडक कारवाई करण्याच्या बाजूनं मी होतो. जर आता कोणाच्या बेनामी संपत्तीवर छापा पडत असल्यास मी त्याचं समर्थन करू शकत नाही. आरजेडीसोबत सरकारमध्ये असताना मी खूप आरोप सहन केले. मात्र आघाडीमध्ये अशा गोष्टी होत असतात, असं धरून मी चाललो. माझ्या पक्षाकडून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर कोणीही टीका केली नव्हती. मात्र राष्ट्रीय जनता दलानं ब-याचदा आमच्यावर वादग्रस्त टीका केली. राष्ट्रीय जनता दलानं सरकारच्या कामातही हस्तक्षेप केला होता. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात अभियान चालवलं होतं. तरीही तेजस्वी यादवला आम्ही एक संधी दिली होती. मात्र त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचं स्पष्टीकरण दिलं नाही. ते स्पष्टीकरण त्यांना जनतेसमोर द्यायचं होतं. तेजस्वी यांनी तसं केलं असतं तर महागठबंधन कायम राहिलं असतं.