देशाला लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:21 PM2019-01-27T17:21:55+5:302019-01-27T17:23:41+5:30
देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे
मदुराई ( तामिळनाडू) - विजय माल्या, निरव मोदी, मेहूल चोकशी यांच्यासारखे उद्योगपती हजारो कोटींचा घोटाळा करून परदेशात पसार झाल्याने केंद्रातील मोदी सरकारची नाचक्की झाली आहे. दरम्यान, आज मदुराई येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोकशी यांचा स्पष्ट संदर्भ देत, देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचा दौरा करून विविध विकासकामांची पायाभरणी केली. यावेळी मदुराई येथे एम्सची पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेला संबोधित केले. त्यात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच सर्वसामान्य प्रवर्गातील गरीबांना दिलेल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या डीएमकेवरही टीकेची तोफ डागली. स्वच्छ भारत अभियानामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
''तामिळनाडूमधील काही लोक आपले हितसंबंध राखण्यासाठी संशय आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करत आहेत. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणामुळे दलित, आदिवासी आणि अन्य घटकांसाठी असलेल्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सर्वांना मिळाव्यात म्हणून हे आरक्षण लागू करण्यात आले आहे.''असे सांगत या आरक्षणाला विरोध करणाऱ्या डीएमकेवर मोदींनी टीका केली. डीएमकेने आर्थिक निकषावरील आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.