अभिभाषणात नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक!
By admin | Published: February 1, 2017 05:46 AM2017-02-01T05:46:10+5:302017-02-01T05:46:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामगिरीची प्रशंसा करून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीत मंगळवारी केलेल्या भाषणात नोटाबंदीचा आणि सीमेपलीकडे
- हरिश गुप्ता, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामगिरीची प्रशंसा करून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीत मंगळवारी केलेल्या भाषणात नोटाबंदीचा आणि सीमेपलीकडे जाऊन करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचा विशेष उल्लेख केला. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरू झाले.
राष्ट्रपती या नात्याने मुखर्जी यांचे संसदेत हे शेवटचे भाषण होते. ते म्हणाले, ‘स्वतंत्र भारतात मुख्य अर्थसंकल्पात रेल्वेचा अर्थसंकल्प विलीन करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे हे ऐतिहासिक अधिवेशन आहे. नोटाबंदीचा निर्णय आणि सर्जिकल स्ट्राइक्सचा उल्लेख राष्ट्रपतींनी करताच, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी त्याचे बाके वाजवून जोरदार स्वागत केले. विरोधी पक्ष सदस्य मात्र निर्विकार होते. राष्ट्रपतींनी काळापैसा रोखण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचा किंवा गरीब कल्याण योजनेचा भाषणात उल्लेख केला, तरी त्यांनी बाके वाजवली नाहीत. मुखर्जी यांनी ‘नारी शक्ती’ आणि रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत महिला खेळाडुंची कामगिरी आणि भारतीय हवाई दलात महिला लढावू वैमानिकांचा झालेला समावेश यांचा उल्लेख करताच सत्ताधारी सदस्यांसोबत विरोधकही बाके वाजवण्यात सहभागी झाले होते. मुखर्जी यांनी देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेने पुढे जाण्याचा जो मार्ग दाखवला आहे त्यात वादविवाद, चर्चा आणि सामावून घेणे याचे महत्व आहे, असे म्हटले. जवळपास तासभर चाललेल्या या भाषणात अनेक सदस्य आपल्या मोबाइलवर फोटो काढताना दिसले तर आनंद शर्मा (काँग्रेस), राम गोपाल यादव (समाजवादी पक्ष), सीताराम येचुरी (माकप) काही वेळ उत्साहाने चर्चा करताना दिसले. नरेंद्र मोदी हे अर्थमंत्री अरुण जेटली आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या शेजारी बसले होते. डॉ. मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी हे पहिल्या रांगेत बसलेले होते.
मुखर्जी यांचे भाषण संपताच तिरुची सिवा (द्रमुक) यांनी तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल आरडाओरड केली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी मुखर्जी यांच्या भाषणातील पहिला आणि शेवटचा परिच्छेद हिंदीत वाचून दाखवत असताना समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव सभागृहातून बाहेर जाताना दिसले. राष्ट्रगीत म्हटले जात असतानाही यादव चालतच जात होते. सेंट्रल हॉलमधून मुखर्जी बाहेर पडल्यानंतर सदस्य तेथून निघून जात असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याशी बोलताना दिसले.