...म्हणून सॅमसंगच्या अध्यक्षांनी जाळले कंपनीचे लाखो फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 03:19 PM2018-07-09T15:19:19+5:302018-07-09T16:16:26+5:30
एक वेळ अशी होती जेव्हा सॅमसंगच्या अध्यक्षांनी आपल्याच कंपनीचे लाखो मोबाईल जाळले होते.
नोएडा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी आज (9 जुलै) नोएडामध्ये सॅमसंगच्या जगातील सर्वात मोठ्या मोबाईल फॅक्टरीचं उद्धाटन केलं आहे. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा सॅमसंगच्या अध्यक्षांनी आपल्याच कंपनीचे लाखो मोबाईल जाळले होते.
1995 मध्ये सॅमसंगने आपला पहिला मोबाईल बाजारपेठेत आणला. त्यावेळी कंपनीचे चेअरमन ली कुन-ही यांनी नववर्षाची भेटवस्तू म्हणून काही जणांना मोबाईल वाटले होते. मात्र ज्यांनी या मोबाईलचा वापर केला त्यांनी हे फोन काम करत नसल्याचं सांगितलं. अशा अभिप्रायांनंतर दक्षिण कोरियातील कंपनीच्या प्लांटवर अचानक एक दिवस ली पोहचले आणि त्यांनी तेथे असलेले कंपनीचे लाखो मोबाईल जाळून टाकले. कंपनी दर्जेदार उत्पादनाच्या निर्मितीवरच फोकस करते हे जगाला दाखवून देण्यासाठी तेव्हा ली यांनी हे पाऊल उचललं होतं.
बायुंग-चुल ली यांनी 1938 मध्ये सॅमसंग या कंपनीची सुरुवात केली होती. मात्र तेव्हा कंपनी ही खाद्यपदार्थांची निर्यात करण्याचं काम करत होती. नूडल्स तयार करण्याचे सामान, पीठ, मासे असे काही पदार्थ कंपनी चीनसह अन्य देशात निर्यात करत असे. 1950 ते 1960 दरम्यान कंपनीने जीवन विमा आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1969 मध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सला सुरुवात झाली. 1980 नंतर सॅमसंगने मोबाईल, मेमरी कार्डसह संगणकाचे भाग तयार करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती.